जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
२४ तास पाणीपुरवठा योजना, शहर मलनिःसारण प्रकल्प, प्रमुख चौक व पुतळ्यांचे सुशोभीकरण, छ. राजर्षी शाहू स्टेडियमवर धर्मवीर आनंद दिघे पॅव्हेलियनसह स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणी, रेल्वे ब्रिज व प्रशासकीय इमारत बांधकाम अशा महत्त्वाकांक्षी उपक्रमांना प्राधान्य देत जयसिंगपूर नगरपरिषदेचे सन २०२६-२७ साठी २७९.९८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक बहुमताने मंजूर करण्यात आले.
नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत सन २०२५-२६ चे सुधारित व २०२६-२७ चे अंदाजित अंदाजपत्रक सादर करण्यात आले. महसुली उत्पन्न ४३.५७ कोटी रुपयांचे प्रस्तावित असून कर महसूल ९.९० कोटी, महसुली अनुदाने व अर्थसहाय्य १९.७८ कोटी, फी व दंड ६.४१ कोटी, व्याज उत्पन्न ४.९० कोटी अशी तरतूद करण्यात आली आहे. विशिष्ट योजनांसाठी १७९.३५ कोटींची अनुदाने व अंशदाने तसेच ४.६९ कोटी ठेवींसह एकूण १८७.५० कोटींची भांडवली जमा दाखविण्यात आली.
खर्चाच्या बाजूला आस्थापना १६.६६ कोटी, प्रशासन १०.८६ कोटी, मालमत्ता दुरुस्ती व परिरक्षण ६.७७ कोटी, विविध कार्यक्रम अंमलबजावणीसाठी ४.६३ कोटी, राखीव निधी ६२.५० लाख अशी तरतूद असून एकूण महसुली खर्च ४२.६१ कोटी आहे. स्थिर व जंगम मालमत्ता निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली खर्च नियोजित करण्यात आला असून १५.१२ लाखांचा शिल्लकी अंदाजपत्रक सादर झाले.
नगरसेवक अर्जुन देशमुख यांनी २००१-०२ मध्ये केवळ ४.५ कोटींचे असलेले अंदाजपत्रक आज २७९.९८ कोटींवर पोहोचल्याचे नमूद करून नगराध्यक्षांचे विशेष कौतुक केले. शहराच्या सर्व भागांचा समतोल विकास साधण्यावर भर देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या कामांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सभेत आभार व्यक्त करण्यात आले. घरफाळा व पाणीपट्टी वसुलीस सर्व नगरसेवकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर केले. विकासाभिमुख तरतुदींमुळे शहराच्या पायाभूत सुविधांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आले. या सभेस सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
: कामगारांसाठी मानधनाचा निधी
नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी स्वतःचे मानधन व भत्ते नगरपरिषदेच्या कामगार कल्याण निधीत जमा करण्याचा निर्णय जाहीर केला. या निधीतून कामगारांच्या आरोग्य, कल्याण व इतर अत्यावश्यक गरजांसाठी खर्च करण्याची सूचना प्रशासनाला देण्यात आली. या निर्णयाचे सभेत सर्व सदस्यांनी स्वागत करत नगराध्यक्षांचे अभिनंदन केले.
