सुरेश कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
अल्टो कारने मोपेडला पाठीमागून ठोकल्याने उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून शिरोळमधील पूजा दत्तात्रय माळी (वय 22 वर्षे )या तरुणीचा जागीच मृत्यू झाला, ही दुर्दैवी घटना सोमवार दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शिरोळ नृसिंहवाडी मार्गावरील संजय सांस्कृतिक हॉल नजीक घडली.
शिरोळमधील पूजा सुभाष पाटील व पूजा दत्तात्रय माळी या दोघे मैत्रिणी धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहून त्या नृसिंहवाडीवरून शिरोळकडे मोपेड वरून येत होत्या, पूजा पाटील मोपेड चालवीत होती तर पूजा माळी पाठीमागे बसली होती ,या दोघी दोघी मोपेडवरून येत असताना संजय सांस्कृतिक हॉल नजीक आले असता उसाने भरलेला ट्रॅक्टर शिरोळच्या दिशेने येत असताना त्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना पाठीमागून येणाऱ्या अल्टो कारने मोपेडला पाठीमागून धडक दिली, या धडकेत पाठीमागे बसलेली पूजा माळी ही तरुणी मोपेड वरून फेकली गेल्याने ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडली, या अपघातात तिच्या डोक्यावरून चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर पूजा पाटील विरोधी दिशेला पडल्याने किरकोळ जखमी झाली, तिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातस्थळी व शिरोळ ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, रात्री उशिरा ग्रामीण रुग्णालयात पूजा माळी हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले, त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला, या घटनेची रात्री उशिरा शिरोळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. मृत पूजा माळी ही अजिंक्यतारा मंडळ परिसरात राहत होती, पदवीधर शिक्षण घेतलेल्या पूजाचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने तिच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली, पूजाच्या पश्चात आई-वडील ,आजा- आजी ,भाऊ असा परिवार आहे, माळी कुटुंबियांचा हृदय पिळवून टाकणारा आक्रोश पाहून सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तरळले.

टिप्पणी पोस्ट करा