हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
शेतात गहू कापण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला महावितरणच्या तुटलेल्या तारेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. शिवाजी नाता माने (वय ६०) असे मृत शेतकऱ्याचे नांव असून महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने शेतकरी वर्गात संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शिवाजी माने हे पहाटे आपल्या शेतात गहू कापण्यासाठी जात होते. याचवेळी महावितरण विभागाच्या पोलवरील तुटून पडलेल्या तारेवर या शेतकऱ्याचा पाय पडल्याने त्यांना विजेचा जबरदस्त धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील व गावातील काही पदधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन महिती घेतली व या घटनेची माहिती कुरुंदवाड पोलिसांना दिली. सध्या या घटनेचा पंचनामा सुरु आहे.
दरम्यान, स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी महावितरणच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे, यातच आता महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याने यावर राजू शेट्टी कोणती भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, संबंधित शेतकऱ्याच्या नातेवाईकांना महावितरण विभागाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा स्वाभिमानी शांत बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी तालुका अध्यक्ष बंडू पाटील यांनी दिला आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी इथे 👇 क्लिक करा
टिप्पणी पोस्ट करा