मुंबई । शिवार न्यूज नेटवर्क :
देवस्थान इनाम व वक्फ जमिनी पिढ्यानपिढ्या कसणाऱ्या, मात्र सातबारा उताऱ्यावर नाव नसल्यामुळे ॲग्रीस्टॅक नोंदणी व कर्जमाफीपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशा शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे केली होती. यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सातबारा किंवा इतर अधिकारात नाव नसलेल्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमदार यड्रावकर यांच्या मागणीला मोठे यश मिळाले आहे.
शिरोळ तालुक्यातील औरवाड, गौरवाड, राजापूर, राजापूरवाडी, आलास आणि खिद्रापूर यांसह अनेक गावांमध्ये देवस्थान इनाम व वक्फ जमिनी शेतकरी पिढ्यानपिढ्या कसत आहेत. प्रत्यक्ष शेती करणाऱ्या या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर मात्र देवस्थान किंवा वक्फ संस्थेचे नाव असल्याने त्यांच्या नावावर जमीन नोंदलेली नाही. त्यामुळे ॲग्रीस्टॅक नोंदणी करताना अडचणी निर्माण होत असून, कर्जमुक्ती योजनेपासूनही ते वंचित राहत आहेत.
ही बाब लक्षात घेऊन आमदार यड्रावकर यांनी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन देवस्थान इनाम व वक्फ जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद करावी, ॲग्रीस्टॅक नोंदणीची अडचण दूर करावी आणि त्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी केली होती. त्यामुळे राज्यातील सातबारा किंवा इतर अधिकारात नाव नसलेल्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. राज्यातील तब्बल २ लाख ३१ हजार शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅकचा प्रश्न या निर्णयामुळे मार्गी लागणार आहे.
अशा शेतकऱ्यांची जमीन व संबंधित कागदपत्रे गोळा करून स्वतंत्र नमुन्यात माहिती तयार करण्यात येणार आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी १५ दिवसांत अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
या निर्णयामुळे देवस्थान इनाम व वक्फ जमिनी कसणाऱ्या शिरोळ तालुक्यासह राज्यातील शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक, फार्मर आयडी तसेच कर्जमाफी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मांडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला सरकारच्या निर्णयामुळे मोठे यश मिळाले आहे.
