अजित कांबळे । शिवार न्यूज नेटवर्क :
"देश सुरक्षित राहण्यासाठी अनेक तरुण रात्रंदिवस सीमेवर सेवा बजावत आहेत. अशा सैनिकांचा आणि त्यांना घडवणाऱ्या माता-पित्यांचा सन्मान करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी व कर्तव्य आहे," असे प्रतिपादन विद्यासागर शिक्षण संस्थेचे चेअरमन व माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री अण्णासाहेब हावले यांनी केले.
विद्यासागर शिक्षण संस्थेच्या प्रांगणात १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी बोरगाव परिसरातील ३० हून अधिक आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या माता-पित्यांचा मान्यवरांच्या हस्ते भावूक वातावरणात विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. शंकर माळी यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कन्नड शाळेचे माजी मुख्याध्यापक महादेव उलपे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.
यावेळी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून बाल विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांची वेशभूषा परिधान केली होती. 'बोले तैसे चाले, त्याची वंदावी पाऊले' या संतवचनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
के. एस. पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. धुळासावंत हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन अण्णासाहेब हावले यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यासागर शिक्षण संस्था संचलित सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रांगोळी स्पर्धेत सहभागी होऊन आपली कला सादर केली.यावेळी गुनि विजेत्या स्पर्धकांना विशेष बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
पुढे बोलताना अण्णासाहेब हावले म्हणाले, "देशाच्या स्वातंत्र्यासाठी भगतसिंग, मंगल पांडे यासारख्या क्रांतीकारकांनी प्राणांचे बलिदान दिले. त्यांचा आदर्श आजच्या तरुणांनी ठेवणे गरजेचे आहे. सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या त्यागात त्यांच्या आई-वडिलांचाही मोलाचा वाटा असतो. अशा भाग्यवंत सैनिकांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्याची संधी मिळणे ही आमच्या संस्थेसाठी अत्यंत प्रेरणादायी बाब आहे."
या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अण्णासाहेब हावले, सी.ई.ओ. कुमारी ऐश्वर्या हावले, संचालक अनुज हावले, सिद्धार्थ हवले , जनरल मॅनेजर श्री संजय हवले, सुकुमार चिप्रे, पंपा म्हैशाळे सर,प्रकाश पाटील, भाऊसाहेब पाटील, रावसाहेब तेरदाळे, बाळासाहेब बसन्नवर, रोहित माने, डॉ. शंकर माळी, महादेव उलपे, शिवप्पा माळगे, विजय शिंगे, विद्याधर अंमणावर, नंदकुमार हावले, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एस ए कोळी,मुख्याधपक राजु खिचडे यांच्यासह विद्यासागर संचलित कन्नड, इंग्लिश, कॉन्व्हेंट स्कूल, आय.टी.आय. कॉलेज, संजय कॉलेज ऑफ फार्मसी व बी.एड. कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक राजू खिचडे सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्री. गावडे यांनी मानले.
