Top News

जुने दानवाडच्या कुमार विद्या मंदिरात माजी विद्यार्थ्यांचा सामाजिक उपक्रम

 स्वातंत्र्य दिनानिमित्त शालेय साहित्य व मिठाईचे वाटप गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस वाटप

प्रल्हाद साळुंखे । शिवार न्यूज नेटवर्क :

 जुने दानवाड, ता. शिरोळ येथील कुमार विद्या मंदिर या मराठी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त इयत्ता सातवीच्या सन १९९८-९९ च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिठाईचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.

‘माझी शाळा, माझा अभिमान’ या संकल्पनेतून माजी विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला. गेल्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते चौथीमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देऊन त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यात आले. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य म्हणून पॅड व मिठाईचे वाटप करण्यात आले.

माजी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेशी असलेले ऋणानुबंध जपत सध्याच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि शाळेशी माजी विद्यार्थ्यांचे नाते अधिक दृढ व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी केलेल्या या योगदानाचे शाळा व ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.

उपक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष बैरागी, प्रसाद कुलकर्णी, फिरोज कुरणे, भरत पाटील, प्रविण वडगावे, अशोक कोकणे आणि बाहुबली चिंचवाडे या माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या या उपक्रमातून माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेप्रती असलेली कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी जपल्याचे दिसून आले.

थोडे नवीन जरा जुने