हेरवाड । शिवार न्यूज नेटवर्क :
पावसापासून बचावासाठी धाब्यावर थांबलेल्या प्रवाशांची तब्बल १ लाख २० हजार रुपये रोख रक्कम असलेली पिशवी विसरली. मात्र, चंद्रकांत मस्के यांनी या पिशवीचा शोध घेऊन ती प्रामाणिकपणे संबंधित प्रवाशांना परत केली. त्यांच्या या माणुसकीचे आणि प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आज (१४ ऑगस्ट) हेरवाड गावातील काही प्रवासी पाऊस सुरू असल्याने चंदू मस्के यांच्या धाब्याजवळ थांबले होते. पाऊस थांबल्यानंतर ते पुढील प्रवासासाठी निघून गेले. मात्र, घाईगडबडीत त्यांची रोकड असलेली पिशवी धाब्यावरच विसरली.
तब्बल तीन तासांनंतर पिशवी विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर प्रवाशांनी पिशवीचा सर्वत्र शोध सुरू केला. त्यामध्ये मोठी रक्कम असल्याने ते चिंतेत पडले होते. दरम्यान, चंद्रकांत मस्के यांनी पिशवीचा शोध घेऊन ती संबंधित प्रवाशांना परत केली. पिशवीमध्ये तब्बल १ लाख २० हजार रुपये रोख रक्कम होती.
एवढी मोठी रक्कम हातात असूनही मस्के यांनी कोणताही मोह न बाळगता ती जशीच्या तशी परत करून प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण केला. कृतज्ञता म्हणून प्रवाशांनी त्यांना पाच हजार रुपये देण्याचा प्रयत्न केला; मात्र मस्के यांनी ते पैसे घेण्यास नम्रपणे नकार दिला.
चंद्रकांत मस्के यांच्या या प्रामाणिकपणाने भावूक झालेल्या महिलेच्या डोळ्यांत अश्रू आले. तिने मस्के यांच्या पाया पडून त्यांचे आभार मानले. त्यांच्या या कृतीचे हेरवाड परिसरातून कौतुक होत असून, ‘प्रामाणिकपणा अजूनही जिवंत आहे’ याचा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला आहे.
