Top News

कोल्हापूर जिल्ह्यात 20 मार्चपर्यंत बंदी आदेश लागू - अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव

कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :  

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने 8 मार्च ते 20 मार्च या कालावधीत बंदी आदेश लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत कलम 37 (1) (अ) ते (फ) तसेच कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी हा आदेश जारी केला आहे. हा आदेश 8 मार्च रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू होऊन 20 मार्च रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावी राहणार आहे.जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष,संघटना व सामाजिक गटांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन, उपोषण,मोर्चे आणि सभा आयोजित केल्या जात आहेत.त्याचबरोबर आगामी काळात जिल्ह्यात विविध यात्रा,सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होणार आहेत.या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच शांतता व सुव्यवस्था कायम राहावी,यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून बंदी आदेश लागू केला आहे.या आदेशानुसार परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणावर जमाव जमविणे,रॅली,मोर्चे किंवा सभा घेणे यावर निर्बंध असतील.मात्र, सरकारी अधिकारी व कर्मचारी त्यांच्या शासकीय कर्तव्याच्या अनुषंगाने काम करताना आवश्यक वस्तू हाताळणे किंवा एकत्र जमणे यास या आदेशातून सूट देण्यात आली आहे. तसेच, पोलीस अधीक्षक,संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी,पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतलेल्या कार्यक्रमांना देखील या आदेशातून सूट असेल. सर्व धर्मांचे सण,उत्सव,जयंती,यात्रा शांततामय मार्गाने साजरे करण्यासाठी जमणाऱ्या नागरिकांनाही यामधून अपवाद देण्यात आला आहे.याशिवाय लग्न समारंभ,धार्मिक विधी, अंत्ययात्रा,यात्रा व इतर पारंपरिक कार्यक्रमांनाही या बंदी आदेशाचा लागू होणार नाही,असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने