Top News

होळीपूर्वी रात्रगस्तीत मोठी कारवाई : रानडुकराची शिकार करणारे सात जण रंगेहाथ पकडले

 


मलकापूर / शिवार न्यूज नेटवर्क : 

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर वन्यप्राण्यांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी वनविभागाने सुरू केलेल्या रात्रगस्त मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली आहे. शाहूवाडी तालुक्यातील मौजे पेरीड येथे रानडुकराची शिकार करणाऱ्या सात जणांच्या टोळीला वनविभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.या कारवाईत मृत रानडुकरासह दोन मोटारसायकली आणि शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले असून न्यायालयाने सर्व आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी मंगळवारी रात्री नियमित गस्त घालत असताना पेरीड येथील ‘आंबे तळे’ परिसरातील शेतात रानडुकराची शिकार झाल्याचे आढळून आले. शिकारीनंतर आरोपी रानडुकराचे मांस कापण्यासाठी त्याला कडवी नदीलगतच्या ‘घोट मळा’ परिसरात नेत असल्याची माहिती वनपथकाला मिळाली. त्यानुसार वनविभागाच्या पथकाने तत्काळ पाठलाग करून आरोपींना झडप घालून पकडले.या कारवाईत सुनील मारुती व्हडम, अशोक ईश्वरा पाटील, शिवाजी बाळू व्हडम, बाजीराव बापू जाधव, संभाजी बंडू यादव, अर्जुन बाबुराव महाडीक आणि सचिन वसंत भोसले (सर्व रा. पेरीड, ता. शाहूवाडी) या सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींच्या झडतीदरम्यान एक मृत रानडुक्कर, तीन पारळी, विळा, सत्तूर, दोन मोबाईल संच आणि दोन मोटारसायकली असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या सर्वांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत विविध कलमान्वये वनगुन्हा नोंदवण्यात आला आहे. बुधवारी आरोपींना शाहूवाडी-मलकापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली.या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून तपास सुरू आहे. उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील व सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी उज्वला मगदूम व त्यांचे पथक पुढील तपास करत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने