मुंबई / शिवार न्यूज नेटवर्क :
वंचित बहुजन आघाडी व, डी.एड., बी.एड. सुशिक्षित बेरोजगार कृती समितीच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना मुंबई येथील मंत्रालय येथे भेटून निवेदन देण्यात आले.
या निवेदनामध्ये ५ सप्टेंबर २०२४ व २३ सप्टेंबर २०२४ रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयांनुसार २० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमणुकीच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी आणि डी.एड., बी.एड. सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींवरील वयाची व पात्रतेची अट शिथिल करून त्यांना किमान मानधन तत्त्वावर तात्काळ शाळांवर रुजू करण्याचा निर्णय घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली.
मुंबई येथे मंत्रालयात जाऊन सदर निवेदन देण्यात आले. यावेळी चालू अधिवेशनामध्ये या मागण्यांचा विचार करून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिल्याची माहिती प्रतिनिधींनी दिली.
निवेदन देताना वंचितचे शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पद्माकर देशमुख, शाहरुख नदाफ तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा