वजन मापे अधिकाऱ्यांनी धाड टाकून जादा दुध घेताना रंगेहात पकडले
सुरेश कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
दुध खरेदी केली जाते त्या काट्याची अचानक धाड टाकून अचूकता तपासली असता हेरवाड व टाकवडे या दोन गावातील डेअरी वर तालुका वजन मापे अधिकारी श्री म.आ. मोदी यांनी उत्पादकाकडून जादा दुध घेतले जात असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर वैध मापन शास्त्र कायद्यान्वये केसेस दाखल झाल्या आहेत.
हेरवाड येथे 4 लिटर मध्ये 100 मिली दुध जादा घेतल्याचे धाडीत सापडले तर टाकवडे येथे खाजगी दुध संकलन केंद्रात मापात पाप करताना सापडले व केसेस झाल्याने तालुक्यातील दुध संस्थात खळबळ माजली आहे.
आंदोलन अंकुश ने दुध डेअरी कडून दुध उत्पादकांची लूट होत असल्याचे समोर आणून जिल्ह्यातील सर्व दुध डेअरी वर धाडी टाकून वजन काट्यांची तपासणी करण्याची मागणी उप नियंत्रक श्री रा.ना. गायकवाड वैध मापन शास्त्र, कोल्हापूर यांच्याकडे केली होती त्यावर त्यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका निरीक्षकांना तपासणी करण्याचे आदेश दिले होते त्या आदेशानुसार शिरोळ तालुक्यात दुध डेअरी वर धाडी टाकल्या गेल्या व त्यामध्ये हेरवाड येथील एक व टाकवडे येथील एक संकलन केंद्र अशा दोन डेअरी कडून उत्पादकांचे जादा दुध घेतले जात असल्याचे पडताळणीत आढळून आले. या दोन संस्थांवर वर वैध मापन शास्त्र (अ ) मधील 30 ( c ) नुसार कारवाई झाली व हेरवाड येथील काटा सील केला आहे. तालुक्यातील सर्व दुध डेअरीची अचानक तपासणी सुरूच राहणार असल्याचे समजते आहे.
दुध उत्पादकांची वजनात व फॅट मध्ये फसवणूक होत असल्यानेच उत्पादकाची आर्थिक दुर्दशा होऊन दुध डेअरी व दुध संघ गब्बर झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वच संघांच्या दुध डेअरी वर धाडी टाकाव्यात म्हणून आम्ही मागणी केली होती. त्यानुसार ही प्रातिनिधिक कारवाई झाली आहे भविष्यात सर्वच डेअरी वर अशी कारवाई होऊ नये म्हणून त्यांनी आपले काटे 10 ml अक्यूरसी चे करून घ्यावेत व उत्पादकांची लूट थांबवावी अशी विनंती आहे.
- धनाजी चुडमुंगे

टिप्पणी पोस्ट करा