Top News

जाखले येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग; सुमारे एक लाखांचे नुकसान

 


पन्हाळा / शिवार न्यूज नेटवर्क :

      पन्हाळा तालुक्यातील जाखले येथे आज सकाळी शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. या आगीत घरातील प्रापंचिक साहित्य, धान्य, कपडे तसेच घराच्या तुळया जळून खाक झाल्या.मिळालेल्या माहितीनुसार, जाखले येथील सत्यवती कॉलनीजवळ राहणारे बाबुराव केरबा खोत यांच्या राहत्या घराला आज सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. घरात त्या वेळी कोणीही नसल्यामुळे आग काही वेळातच भडकली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.घरातून धूर निघत असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने बाबुराव खोत यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याच्या अग्निशमन बंबाला याबाबत कळविण्यात आले. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.मात्र तोपर्यंत घरातील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आगीत घरातील धान्य, कपडे, घरगुती साहित्य तसेच घराच्या तुळया जळून खाक झाल्यामुळे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

     घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने