सुनिल दावणे / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील न्यू इंग्लिश स्कूल, खणदाळ प्रशालेत 'राष्ट्रीय विज्ञान दिन' अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. थोर भारतीय शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांच्या सन्मानार्थ आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेच्या पूजनाने झाली. प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण रामलिंग हिरेमठ यांच्या हस्ते विज्ञानाचे महत्त्व विषद करण्यात आले. याप्रसंगी बोलताना विज्ञान शिक्षक निलेश मारुती पाटील यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व पटवून दिले. "दैनंदिन जीवनात विज्ञानाची कास धरणे आणि अंधश्रद्धा दूर सारून प्रयोगशील राहणे हीच काळाची गरज आहे," असे विचार त्यांनी मांडले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यानिमित्त प्रशालेत विज्ञान विषयावर आधारित शास्त्रज्ञांची माहिती व शोध पोस्टर स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
कुमारी श्रिया राजेंद्र दळवाई हिने विज्ञानातील प्रगतीवर प्रभावी वक्तृत्व सादर केले. कुमारी अन्नपूर्णा मगदूम, भूमिका पाटील हिने ओजस्वी भाषणातून विज्ञानाचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी अतिशय आकर्षक आणि माहितीपूर्ण पोस्टर्स तयार करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला शिक्षक अण्णासाहेब पांडुरंग सुतार यांनी मार्गदर्शन करत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच शिक्षका विजया सूर्यवंशी,लिपिक धर्मगोंडा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.धोंडीबा जाधव, आप्पासो कोणूरी व आकाश गोईलकर यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात मोलाचा सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सांगता सुदर्शन पाटील यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रती विशेष उत्साह पाहायला मिळाला.
