शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ येथील कन्या विद्या मंदिर शाळेला छत्रपती ताराराणी यांचे नाव देऊन त्यांच्या शौर्य, नेतृत्व व समाजकार्याच्या आदर्शांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये दर्जेदार व आधुनिक शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी शिरोळ तालुक्यातील पाच शाळांना ‘मॉडेल स्कूल’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात येणार असून आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील शाळांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी आर्थिक नियोजनाबाबत डीपीसी बैठकीत चर्चा झाली असून लवकरच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या शाळांना देखील निधी उपलब्ध होवून शाळांचा दर्जा वाढविण्यास मदत होणार आहे. पालकांचा विश्वास टिकवून शिक्षणाचा दर्जा उंचावणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. शिरोळ येथे छत्रपती ताराराणी कन्या विद्या मंदिर शाळेचा नामकरण सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते.
यावेळी आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व स्पर्धात्मक शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषद शाळांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ठोस पावले उचलली जातील. बदलत्या शैक्षणिक वातावरणात ग्रामीण शाळांनीही आधुनिकतेची कास धरणे आवश्यक असून तंत्रज्ञानाधारित शिक्षण, डिजिटल साधने, सुसज्ज प्रयोगशाळा आणि समृद्ध ग्रंथालये यांवर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि त्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी सक्षम बनविणे हे मुख्य उद्दिष्ट असून यासाठी शिक्षकांची भूमिकाही महत्त्वाची आहे. पालक, शिक्षक आणि प्रशासन यांच्या समन्वयातून शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
शाळांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि क्रीडा-सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली जाईल. ग्रामीण शिक्षण मजबूत झाले तरच समाजाच्या प्रगतीला गती मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
या प्रसंगी बॉडीबिल्डर महेश पाटील, क्रिडा रत्न पुरस्कार प्राप्त शाहरुख खलिफ यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर पीएमश्री छत्रपती विद्या मंदिर शाळा नंबर ३ मधील शाळेच्या खोल्यांचा उद्घाटन समारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक भगवान कोळी यांनी केले. कार्यक्रमास अमरसिंह पाटील, जि.प. सदस्य अमोल चव्हाण, डॉ. अरविंद माने, विस्तार अधिकारी दिपक कामत, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव अजिंक्य पाटील, नगरसेविका शिवानी कांबळे, श्वेता जाधव, नगरसेवक अमर शिंदे, मुख्याध्यापक घोळवे, सुरज कांबळे, शमा खलिफा, शुभांगी फल्ले, जयश्री पाटील, हेमलता जाधव, दिवाण कोळी, नंदू गजरे, सिद्धाप्पा बंडगर यांच्यासह मुख्याध्यापक सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार बजरंग काळे यांनी मानले.
