सुनिल दावणे / शिवार न्यूज नेटवर्क :
खणदाळ (ता. गडहिंग्लज) : येथील न्यू इंग्लिश स्कूल, खणदाळ प्रशालेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप व शुभेच्छा समारंभ आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरुण रामलिंग हिरेमठ होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवराज कॉलेजचे प्रा. डॉ. रंगराव पांडुरंग हेंडगे उपस्थित होते.
प्रा. हेंडगे यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करताना विविध शैक्षणिक संधींची माहिती दिली. आत्मविश्वास, मेहनत आणि सातत्य या गुणांच्या बळावरच यश संपादन करता येते, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी त्यांचे मार्गदर्शन मनोभावे ऐकून घेतले.
वर्गशिक्षक निलेश पाटील व चिदानंद हुचगोंड यांनी दहावीच्या बोर्ड परीक्षेबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. नियमित अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन आणि सकारात्मक विचार यावर त्यांनी विशेष भर दिला. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यश निश्चित मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी गावच्या सरपंच अश्विनी पाटील, माजी उपसभापती ईराप्पा हसूरी, प्रा. संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विनोद चिरमुरे, सुदर्शन पाटील, सचिन लोहार, धर्मगोंडा पाटील, आकाश गोईलकर, धोंडीबा जाधव व आप्पासो कोणूरी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अण्णासाहेब सुतार यांनी केले, तर विजया सूर्यवंशी यांनी आभार प्रदर्शन केले. समारंभामुळे विद्यार्थ्यांना नव्या वाटचालीसाठी प्रेरणा व आत्मविश्वास मिळाला.
