जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदी, वारणा नदी आणि पंचगंगा नदी पात्रात मगरींचा वाढता वावर हा गेल्या काही वर्षांत गंभीर प्रश्न बनला आहे. नदीकाठच्या गावांमध्ये शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री पाणी मोटार सुरू करताना जीव मुठीत धरावा लागतो. काही ठिकाणी मगरींच्या हल्ल्यांत जीवितहानी झाली असून जनावरे जखमी होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूर येथे ‘क्रोकोडाइल पार्क’ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव मांडला आहे.
जयसिंगपूर परिसरात सुमारे २५ ते ३० एकरांपर्यंत उपलब्ध असलेल्या खण क्षेत्राचा उपयोग करून नदीपात्रातील मगरी सुरक्षितरीत्या स्थलांतरित करण्याची योजना आहे. या प्रकल्पामुळे दोन उद्दिष्टे साध्य होतील—नदीकाठच्या नागरिकांची सुरक्षा वाढेल आणि तालुक्याला पर्यटनाच्या नकाशावर नवी ओळख मिळेल. नियोजित पार्कमध्ये संरक्षित कुंपण, निरीक्षण मनोरे, मार्गदर्शक सुविधा आणि माहिती केंद्र उभारण्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.
या निर्णयामागे केवळ वन्यजीव व्यवस्थापनाचा हेतू नसून ‘संकटाला संधी’ बनवण्याचा व्यापक दृष्टिकोन आहे. वाढत्या मगरसंख्येमुळे निर्माण झालेल्या भीतीचे रूपांतर नियोजित पर्यटन प्रकल्पात करून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा विचार पुढे आला आहे. पार्क उभारल्यास स्थानिक युवकांना रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील, तसेच हॉटेल, मार्गदर्शक सेवा, स्थानिक विक्री व्यवसाय यांना प्रोत्साहन मिळेल.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले आहेत. वनविभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून प्रकल्पाची तांत्रिक पाहणी, पर्यावरणीय मंजुरी आणि सुरक्षाविषयक आराखडा निश्चित केला जाणार आहे.
शिरोळ तालुका धार्मिक आणि पर्यटन स्थळांमुळे आधीच ओळखला जातो. प्रस्तावित क्रोकोडाइल पार्कमुळे या ओळखीला नवा आयाम मिळू शकतो. नागरिकांच्या सुरक्षिततेसह पर्यावरणपूरक पर्यटनाची सांगड घालणारा हा प्रकल्प यशस्वी झाल्यास तो राज्यातील एक आदर्श मॉडेल ठरू शकतो. आता प्रशासनाच्या गतीमान निर्णयप्रक्रियेवर आणि सर्व संबंधित विभागांच्या सहकार्यावर या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे भवितव्य अवलंबून आहे.
