Top News

जयसिंगपुरात बंद फ्लॅट फोडून १ लाख ७५ हजारांचा ऐवज लंपास



 जयसिंगपूर । शिवार न्यूज नेटवर्क : 

 जयसिंगपूर शहरातील स्टेशन रोड परिसरात बंद फ्लॅटचे कडी-कोयंड्याचे स्क्रू काढून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातील तिजोरी फोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि लॉकरची चावी असा एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.

याबाबत कलगोंडा शामगोंडा मोळाज (वय ७२, सेवानिवृत्त शिक्षक, रा. स्नेह संकुल अपार्टमेंट, स्टेशन रोड, जयसिंगपूर) यांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जुलै रोजी रात्री नऊ वाजल्यापासून २१ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाली. चोरट्याने फ्लॅटच्या मुख्य दरवाजाच्या कडी-कोयंड्याचे स्क्रू कशाच्या तरी सहाय्याने काढून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लाकडी कपाटातील तिजोरीत ठेवलेले सोन्याचे टॉप्स, कानातील फुले, सोन्याचे वेडण, चांदीच्या आरतीच्या वस्तू, चांदीची जपमाळ तसेच १५ हजार रुपये रोख रक्कम आणि पतसंस्थेच्या लॉकरची चावी असा मुद्देमाल लंपास केला.

घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व अन्य पुराव्यांच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक इनामदार करीत आहेत.

थोडे नवीन जरा जुने