खाकी वर्दीतील जिगरबाज अधिकारी
कुरुंदवाड । शिवार न्यूज नेटवर्क :
करवीर तालुक्यातील दिंडनेर्लीच्या हिरव्यागार मातीत घडलेला, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत खाकी वर्दीत दाखल झालेला आणि नक्षलप्रवण गडचिरोलीत जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणारे अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार अनिल डोईजड यांची कारकीर्द आहे. नक्षलवाद्यांच्या एन्काऊंटरमध्ये सहभाग, दुर्गम भागातील कम्युनिटी पोलिसिंग आणि राष्ट्रपती शौर्यपदकासह विविध सन्मानांनी गौरवलेला त्यांचा प्रवास नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
दिंडनेर्ली येथे बालपण गेलेल्या डोईजड यांच्यावर आजोबा दिनकर शेटे, आजी सावित्री, मामा शिवानंद व मामी मनीषा शेटे यांचे संस्कार झाले. आजोबांनी लहानपणी तालमीत व्यायामाची शिस्त लावली आणि विविध वर्तमानपत्रे वाचण्याची सवय लावली. त्यातूनच अधिकारी होण्याची बीजे मनात रुजली.
दिंडनेर्लीतील विद्यामंदिरमध्ये प्राथमिक, तर ईश्वरा वाडकर हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कोल्हापुरातील महाराष्ट्र कॉलेज व न्यू कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. मिरजकर तिकटी परिसरातील छोट्याशा खोलीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू असतानाच काका मधुकर रामचंद्र नरूटे यांच्या मिरची व धान्य व्यापारात दिवसभर काम आणि रात्री अभ्यास अशी त्यांची धडपड सुरू होती. या काळात त्यांनी तब्बल बारा शासकीय नोकऱ्या मिळवल्या; मात्र खाकी वर्दीचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते.
२०११ मध्ये एमपीएससीच्या माध्यमातून पोलिस उपनिरीक्षक पदावर त्यांची निवड झाली. त्यानंतर आव्हानात्मक ठिकाणी काम करण्याचा निर्धार करत त्यांनी गोंदिया आणि गडचिरोली येथे नियुक्ती घेतली. अहेरी व एटापल्लीसारख्या नक्षलप्रवण भागात त्यांनी जबाबदारी सांभाळली. सहकाऱ्यांसह जीवाची पर्वा न करता कारवाया करत सहा नक्षलवाद्यांच्या एन्काऊंटरमध्ये त्यांनी सहभाग घेतला.
नक्षलप्रवण भागात केवळ बंदुकीच्या जोरावर नव्हे, तर नागरिकांचा विश्वास जिंकणेही आवश्यक असल्याचे ओळखून त्यांनी कम्युनिटी पोलिसिंगवर भर दिला. जात प्रमाणपत्र शिबिरे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि नागरिकांचे समुपदेशन अशा उपक्रमांतून पोलिस व शासनाबद्दल विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
२०१७ चे पोलिस महासंचालक पदक, २०१८ चे विशेष सेवा पदक, २०१९ चे आंतरिक सुरक्षा पदक आणि २०२० चे राष्ट्रपती शौर्यपदक अशा सन्मानांनी त्यांच्या धाडसी सेवेची दखल घेण्यात आली.
२०२१ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात बदली झाल्यानंतर राधानगरी, त्यानंतर कोडोली येथे त्यांनी सेवा बजावली. जोतिबा यात्रेसारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यांच्या बंदोबस्ताचे आव्हानही त्यांनी समर्थपणे पेलले. तुझ्यासोबत पुणे लोणावळा या ठिकाणी ड्रग्जची पाळीमुळे खोधून काढली त्याचबरोबर ३० कोटी रुपयाचा फसवणुकीचा गुन्हा त्यांनी उघडकीस आणला. त्यानंतर ते कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस खाण्याचा कार्यभार तीन महिने सांभाळून आता कुरुंदवाड पोलिस ठाण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २७ गावांमध्ये कायदा-सुव्यवस्था मजबूत ठेवणे, गुन्हेगारीवर वचक निर्माण करणे आणि नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास वाढविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. नक्षलवाद्यांना डोईजड ठरलेले हे जिगरबाज अधिकारी आता कुरुंदवाडच्या गुन्हेगारीला डोईजड करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
