जयसिंगपूर । शिवार न्यूज नेटवर्क :
जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा गावठी हातभट्टी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करणाऱ्या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली. या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये पोलिसांनी तब्बल ४८० लिटर गावठी हातभट्टी दारू आणि १०,३४० रोख रक्कम, असा एकूण ४०,३४० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पहिल्या कारवाईत कार्तिक सतीश माने (वय २६, रा. जयसिंगनगर, जयसिंगपूर) याच्याकडून जयसिंगपूर-नांदणी नाका रोडवरील जयसिंगनगर परिसरात १०० लिटर गावठी हातभट्टी दारू व १०,३४० रोख, असा एकूण २०,३४० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रहिमान रमजान शेख यांनी फिर्याद दिली आहे.
दुसऱ्या कारवाईत हिना मोहन मछले (वय ५९, रा. शाहूनगर, घर नं. ३९, जयसिंगपूर) हिच्याकडून २०० लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. या दारूची किंमत २० हजार असून, बेकायदा विक्रीच्या उद्देशाने दारू बाळगल्याप्रकरणी तिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही गुन्हे २० ऑगस्ट २०२६ रोजी दाखल झाले असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कुलकर्णी व पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबर करीत आहेत.
