कुरुंदवाड । शिवार न्यूज नेटवर्क :
येथील महात्मा बसवेश्वर चौकातील सलमान टी स्टॉलवर प्लेट धुत असलेल्या तरुणाला मोटारसायकलच्या शॉकअपर्सची स्टील पाईप, कोयता, लोखंडी स्टूल व झारा याने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहरुख जमीर मुल्ला (वय २८, रा. मोमीन गल्ली, कुरुंदवाड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आरिफ जमीर बागवान (वय २८), सुबहान जमीर बागवान (वय २६), सोहल मन्सुर खलिफा (वय २८), साजिद अब्दुल बागवान (वर्गे) (वय ३५), साबीर रियाज बागवान (वर्गे) (वय १८) आणि रियाज अब्दुल बागवान (वर्गे) (वय ४०), सर्व रा. कुरुंदवाड, अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, २१ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शाहरुख हे महात्मा बसवेश्वर चौकातील सलमान टी स्टॉलवर प्लेट धुत होते. त्यावेळी आरोपी क्रमांक १ ते ३ यांनी मोटारसायकलच्या शॉकअपर्सची स्टील पाईप वापरून त्यांच्या डोक्यावर व पाठीवर मारहाण केली. आरोपी क्रमांक २ याने येडका/कोयत्याने त्यांच्या उजव्या कानाच्या वरील बाजूस डोक्यात वार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
तसेच आरोपी क्रमांक ४ याने लोखंडी स्टूलने तोंडावर, आरोपी क्रमांक ५ याने लोखंडी झाऱ्याने पाठीवर, तर आरोपी क्रमांक ६ याने पोटावर व छातीवर लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पुन्हा मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल चव्हाण करीत आहेत.
