जयसिंगपूर । शिवार न्यूज नेटवर्क :
वैदु समाजातील जात पंचायतीच्या माध्यमातून कुटुंबाला समाजातून बहिष्कृत करून वाळीत टाकल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुरेश मुत्ताप्पा वैदु (वय ५१, रा. शांती सागर कॉलनी, १०० फुटी रोड, सांगली; मूळ रा. राजीव गांधी गल्ली क्रमांक ९, जयसिंगपूर) यांनी फिर्याद दिली आहे. महेश दुर्गाप्पा वैदु, आप्पाई गोविंद पिंढरे, गोविंद जंगाप्पा वैदु, राम गोविंद वैदु, राजू शंकर वैदु, रवी गोविंद वैदु व राकेश महेश वैदु (सर्व रा. गल्ली क्रमांक ९, राजीव गांधी नगर, जयसिंगपूर) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे वैदु समाजातील आहेत. आरोपी क्रमांक १ ते ५ हे समाजातील जात पंचायतीमधील पंच असून आरोपी क्रमांक ६ व ७ हे फिर्यादीचे नातेवाईक आहेत. फिर्यादीने आरोपी क्रमांक ६ व ७ यांच्याविरुद्ध दाखल केलेली केस मागे घेतली नाही, या कारणावरून त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादीच्या कुटुंबातील गुरु पूजेला समाजातील महिला व पुरुषांनी उपस्थित राहू नये, तसेच समाजाच्या कार्यक्रमांना कुटुंबाला आमंत्रित करू नये, असा मज्जाव करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे कुटुंबाला समाजातून वाळीत टाकल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र सामाजिक बहिष्करापासूनरापासून व्यक्तींचे संरक्षण (प्रतिबंध, बंदी व निवारण) अधिनियम २०१६ चे कलम ३ (१), (२), (४), (८), (१०), (१६) तसेच बीएनएस २०२३ मधील कलम ३५१ (२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जयसिंगपूर पोलिस करीत आहेत.
