Top News

शेतकऱ्यांना बंधारा हवा असल्यास पुन्हा बांधकाम सुरू करू.. कामाला अडथळा आणणाऱ्यांनी उगीच कांगावा करू नये; नगरसेवक शरद जंगटे

 


अजित कांबळे । शिवार न्यूज नेटवर्क :

      बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा तसेच शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रस्तावित बंधाऱ्याचे काम पुन्हा सुरू करण्याची भूमिका नगरसेवक शरदराव जंगटे यांनी स्पष्ट केली. “शेतकऱ्यांना बंधारा हवा असेल तर पुन्हा बांधकाम सुरू करू; विकासकामांना अडथळा आणणाऱ्यांनी उगीच कांगावा करू नये,” असा इशाराही त्यांनी दिला.

        बोरगावच्या शेतकऱ्यांची पाण्याची अडचण जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी या प्रश्नाचा तत्काळ पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत आमदार शशिकला जोल्ले यांनी विशेष प्रयत्न करून सन २०२१-२२ मध्ये पूलवजा बंधाऱ्यासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता. कामाला सुरुवातही झाली; मात्र काही संघटनांच्या विरोधामुळे काम रखडल्याचा दावा जंगटे यांनी केला.

आमदार शशिकला जोल्ले यांच्या सूचनेनुसार लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी जगदीश पोळ यांनी बोरगाव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी जुन्या पुलाची दुरुस्ती नको, तर नवीन बंधाराच उभारावा, अशी मागणी केली. याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

“बंधाऱ्याच्या कामाला विरोध करणाऱ्यांनी आता दुरुस्तीची भाषा करू नये. श्रेयवादापेक्षा बोरगावच्या शेतकऱ्यांना पाणी मिळणे महत्त्वाचे आहे. अण्णासाहेब जोल्ले यांनी पाठपुरावा केला आणि आमदार शशिकला जोल्ले यांनी निधी उपलब्ध करून दिला. आता रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी आपण पुन्हा पाठपुरावा करू,” असे नगरसेवक जंगटे यांनी सांगितले.

      दरम्यान, चिलकादेवी माळ भागातील सुमारे १२०० एकर शेतीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर असून, बंधारा झाल्यास शेतीसह शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नालाही मोठी मदत होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आमदार शशिकला जोल्ले व अण्णासाहेब जोल्ले यांच्या माध्यमातून बंधाऱ्याच्या कामाला पुन्हा चालना मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

       यावेळी डॉ. महावीर घाळे, राजू लटलटे, बी. के. महाजन, महापती खोत,अजित तेरदाळे, शंकर गुरव, श्रीपाल गोसावी, किसन गोसावी ,रावसाहेब चोकावे , संजय गजबरे ,बाहुबली कमते, सुनील गोरवाडे ,धवल भीवरे, शितल गोरवाडे, महादेव एदमाळे, कुमार चिपरे, जितेंद्र भोजे, बबन रेंदाळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने