Top News

एसटी ही ग्रामीण जनतेची जीवनवाहिनी : बंडू बरगाले

कुरुंदवाड आगारात एसटीचा वर्धापन दिन संपन्न 

कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

 सन १९४८ मध्ये पुणे ते अहिल्यानगर या मार्गावर पहिली एसटी बस धावली आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. एसटी ही केवळ प्रवासी वाहतुकीची सेवा नसून ग्रामीण जनतेची जीवनवाहिनी आहे. शिक्षण, रोजगार, आरोग्य, व्यापार आणि सामाजिक संपर्क यासाठी लाखो नागरिक आजही एसटीवर अवलंबून आहेत. दुर्गम भागातील गावांना शहरांशी जोडून विकासाची गंगा पोहोचविण्याचे काम एसटीने केले आहे. अनेक नैसर्गिक आपत्ती, पूर, दुष्काळ आणि संकटांच्या काळातही एसटी कर्मचारी जनसेवेसाठी तत्पर राहिले आहेत. त्यांच्या त्याग, समर्पण आणि सेवाभावामुळेच एसटी आजही सर्वसामान्यांचा विश्वास टिकवून आहे. राज्याच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासात एसटीचे योगदान मोलाचे असून तिच्या कार्याचा प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे, असे मत सामाजिक कार्यकर्ते बंडू बरगाले यांनी व्यक्त केले.

शिरोळ तालुका पुरोगामी मंच, राष्ट्र सेवा दल आणि क्रांती फाऊंडेशन हेरवाड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बरगाले बोलत होते. कार्यक्रमात एसटी महामंडळाच्या राज्याच्या विकासातील योगदानाचा गौरव करण्यात आला तसेच कर्मचाऱ्यांच्या सेवाभावाला अभिवादन करण्यात आले.

राष्ट्र सेवा दलाचे महामंत्री बाबासाहेब नदाफ यांनी मार्गदर्शन करताना एसटी महामंडळाच्या इतिहासाचा आढावा घेतला. 

यावेळी उपस्थित मान्यवरांनी एसटी महामंडळाच्या उज्ज्वल परंपरेचा गौरव करत कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास रावसाहेब आलासे, खंडेराव हेरवाडे, सचेतन बनसोडे, मुस्कान नदाफ, सिमरन नदाफ, संतोष जुगले, दिनकर गावडे, अजिंक्य गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

थोडे नवीन जरा जुने