Top News

गौरवाडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; सात जणांवर गुन्हा, दोन लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

 

ai photo


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : 

शिरोळ तालुक्यातील गौरवाड येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर कुरुंदवाड पोलिसांनी धाड टाकून सात जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम, पत्त्यांचा संच व तीन मोटारसायकली असा एकूण २ लाख १९ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३१ मे  रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गौरवाड येथील सहदेव बाबू कांबळे यांच्या बंद पत्र्याच्या खोलीच्या आडोशाला उघड्यावर काही जण तीनपानी पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कुरुंदवाड पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.

या कारवाईत प्रशांत कल्लाप्पा उगारे (वय ४२), सुभाष जंबू उगारे (वय ६६), बाळू दादू गावडे (वय ६३), दुर्गाप्पा रामचंद्र ऐवळे (वय ५५), महावीर दादू सावळवाडे (वय ६१), अंजुम खुद्दबुद्दीन मुल्ला (वय ६१) आणि अशोक आण्णाप्पा गडगले (वय ६७, सर्व रा. गौरवाड, ता. शिरोळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धाडीदरम्यान घटनास्थळावरून ४ हजार २९० रुपये रोख रक्कम, पत्त्यांची पाने तसेच विविध कंपन्यांच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींसह एकूण मुद्देमालाची किंमत २ लाख १९ हजार २९० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश बाबासो जडे यांनी फिर्याद दिली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानदेव सानप करीत आहेत.

थोडे नवीन जरा जुने