कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथे बेकायदेशीर हातभट्टी दारू बाळगणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध कुरुंदवाड पोलिसांनी कारवाई करत महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत १३ लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३१ मे रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास शाहूनगर, अब्दुललाट येथील राहत्या घराच्या पाठीमागे उघड्यावर आरोपी मनोज हरी मिणेकर (वय ६३, रा. अब्दुललाट, ता. शिरोळ) हा बेकायदेशीररित्या हातभट्टीची तयार दारू साठवून ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून तपासणी केली असता आरोपीच्या ताब्यातून सुमारे १३ लिटर हातभट्टीची तयार दारू आढळून आली. जप्त दारूची किंमत अंदाजे १ हजार ३०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. नियमांनुसार दारूचा नमुना घेऊन उर्वरित दारू जागीच नष्ट करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन पुजारी यांनी फिर्याद दिली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार कोळी करीत आहेत.
