Top News

श्री गुरुदत्त शुगर्सला राज्यस्तरीय सीएसआर पुरस्कार



जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त शुगर्स यांना सामाजिक बांधिलकी आणि उल्लेखनीय समाजोपयोगी कार्याबद्दल वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) तर्फे सन २०२५-२६ चा राज्यस्तरीय सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथे आयोजित शुगर व बायोएनर्जी पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे , महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील तसेच विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कारखान्याच्या वतीने एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे व अधिकाऱ्यांनी हा सन्मान स्वीकारला.

कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली श्री गुरुदत्त शुगर्सने तांत्रिक कार्यक्षमतेसोबतच सामाजिक कार्यामधून परिसराच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. कारखान्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सुमारे दहा हजार कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

शिरोळ तालुक्यात २००५, २०१९, २०२१ आणि २०२४ मध्ये आलेल्या महापुरांच्या काळात कारखान्याने सुमारे १० हजार पूरग्रस्त नागरिक आणि ५ हजार जनावरांसाठी स्वखर्चाने छावण्या उभारून मोठी मदत केली. तसेच २०१८ मधील केरळ महापूर आणि २०२५ मधील मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपली. कोरोना महामारीच्या काळात पाच हजार ऊसतोड मजूर, एक हजार रिक्षाचालक आणि जोतिबा डोंगरावरील एक हजार पुजाऱ्यांना महिनाभर पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.कोरोना लसीकरणसाठी ५० हजार सिरिंज उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे लसीकरण मोहिमेला मोठा हातभार लागला.

सामाजिक कार्याच्या माध्यमातून कारखाना परिसरातील विविध रस्ते व पुलाच्या कामांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात महत्त्वाची भूमिका श्री. घाटगे यांनी बजावली. तसेच शिरोळ तालुक्यातील विविध मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी योगदान देण्यात आले असून गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे.

२०१८ मध्ये शिरोळ तालुक्यात जनावरांमध्ये लाळ-खुरकत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर श्री गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यात पशुवैद्यकीय शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांमधून सुमारे २० हजार जनावरांची मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात आले. कारखान्याच्या किसान कार्ड योजनेतून ऊस पुरवठा करणाऱ्या १० हजार शेतकऱ्यांना विविध शस्त्रक्रिया व उपचारांसाठी सुमारे ५० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. 


"महाराष्ट्राच्या साखर उद्योगाच्या पटलावर श्री गुरुदत्त शुगर्स आणि सामाजिक कार्य हे एक समीकरण बनले आहे. संकटाच्या काळात मानवतेच्या भावनेतून नागरिकांच्या मदतीला धावून जाणे हे आमचे कर्तव्य आहे. नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय मदत तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये आम्ही कोणतीही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेने योगदान दिले आहे. भविष्यातही कोणत्याही संकटाच्या काळात श्री गुरुदत्त शुगर्स परिवार शेतकरी व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील."

— माधवराव घाटगे

चेअरमन, श्री गुरुदत्त शुगर्स



थोडे नवीन जरा जुने