"पत्रकारितेचा धर्म निष्ठेने जपत, शब्दांशी प्रामाणिक राहून ज्याने चार दशके लोकशाहीचा चौथा स्तंभ ग्रामिण भागात भक्कमपणे पेलला..." असे म्हटले तर वावगे ठरणार नाही असे आपले परममित्र आणि शिरोळ तालुक्याच्या पत्रकारितेचा मानबिंदू आदरणीय श्री. आनंदराव शिंगे १ जून रोजी आपल्या आयुष्याच्या 67 व्या वर्षात पदार्पण करत आहेत!
शिरोळ तालुक्याने गेल्या 43 वर्षांत अनेक राजकीय वादळे पाहिली, सहकारातील स्थित्यंतरे अनुभवली आणि शेतकरी चळवळींचे मोठे संघर्ष पाहिले. या प्रत्येक ऐतिहासिक क्षणाचे केवळ साक्षीदार न राहता, आपल्या टोकदार आणि निष्पक्ष लेखणीने तो इतिहास कागदावर उतरवण्याचे काम आनंदराव शिंगे यांनी केले आहे. म्हणूनच संपूर्ण तालुक्यात त्यांना शिरोळ तालुक्याचा 'चालता-बोलता इतिहास' म्हणून आदराने ओळखले जाते.
१९८3 साली त्यांनी दैनिक प्रतिध्वनी मिरज या दैनिकासाठी कुरुंदवाड शहरासाठी वार्तांकन करण्याचे काम सुरू केले व पत्रकारिता क्षेत्रातील आपल्या कारकिर्दीस सुरवात केली. एका गरीब, मागासवर्गीय, शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना फक्त आपल्या कल्पकतेच्या व इच्छेच्या जोरावर वृत्तपत्र क्षेत्रात वार्ताहर म्हणून पदार्पण केले. सुमारे ८० च्या दशकाचा काळ व पत्रकारिता क्षेत्राचे तत्कालीनं स्वरूप पाहता सुरवात ही खडतर होती. प्रसंगी चालत, एस टी अथवा सायकलने प्रवास करून ग्रामीण भागात वार्तांकन करून जिल्ह्याच्या ठिकाणी वेळीच बातमी वृत्तपत्र कार्यालयात पोच करणे हेच मोठे जिकिरीचे होते त्याची कल्पना करणे आत्ताच्या वेगवान दळणवळणाच्या काळात कठीण आहे. परंतु आनंदराव शिंगे यांनी अशा काळात पत्रकारिता ग्रामीण भागात जोपासली. फक्त २५ रु. च्या तुटपुंज्या मानधनावर सुरवात केली. शिरटी सारख्या छोट्याशा गावातून येऊन आपल्या मेहनतीच्या, कल्पकतेच्या व बुद्धिमत्तेच्या जोरावर तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात आदराचे स्थान मिळवले. तालुक्यातील सर्व क्षेत्रातील लोकांना आपल्या हसतमुख, मनमिळाऊ व ऋजू स्वभावाने आपलेसे केले. तत्कालीन पत्रकारिता ही कालानुरूप खडतर, कष्टप्रद व अल्प अर्थार्जनाची होती. सध्याचे स्वरूप त्यास प्राप्त झाले नव्हते. पण आनंदराव शिंगे यांनी हा पत्रकारितेचा वसा अखंड जपला. त्यांनी पत्रकारितेचा ध्यास व वीणा अखंड चालू ठेवली ती आजतागायत खाली ठेवली नाही. समोर कोणत्याही क्षेत्रातील कितीही मोठी व्यक्ती असुदे आपल्या मनातील प्रश्न विचारण्यात ते कधीही कचरले नाहीत. त्यामुळे पत्रकारिता क्षेत्रात आपली छाप निर्माण केली. त्याकाळाची पत्रकारिता म्हणजे घरावर तुळशीपत्र ठेवण्यासारखे होते, कारण गावोगावच्या वार्ताहराना तुटपुंज्या किंबहुना कोणत्याही मानधनाशिवाय काम करावे लागत असे. सध्या आपण पाहतो इतके वृत्तपत्रे ही अर्थकारणात सक्षम नव्हती. परंतु अशा परिस्थितीत सुद्धा आनंदराव शिंगे यांनी पत्रकारितेचे व्रत व बांधिलकी कायम ठेवली आहे हे त्यांचे श्रेय म्हणावे लागेल.
१९९१ मध्ये दैनिक तरुण भारत बेळगाव या वृत्तपत्रात कुरुंदवाड शहर प्रतिनिधी म्हणून ते रुजू झाले आणि त्यांच्या लेखणीला बहर आला व त्यांनी त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. खासकरून कुरुंदवाड शहरात कार्यरत असणारे राजकीय गट तट, मतप्रवाह, सामाजिक घडामोडी ई. चे ते साक्षीदार आहेत. प्रसंगी त्यांची लेखणी या सर्व घडामोडींचा केंद्रबिंदू ठरत होती असे म्हंटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
शिरोळ तालुक्यात ५२ खेडी व ३ शहरे आहेत. या प्रत्येक ठिकाणी आनंदराव शिंगे याना ओळखणारी माणसे भेटतील असे तालुक्यातील एकही गाव अथवा शहर नाही जिथे त्याना ओळखत नाहीत. त्यांचा जनसंपर्क अवाक करणारा आहे. त्यांचा लोकसंग्रह करणारा स्वभाव व सर्वांना मदत करण्याची तयारी त्याना लोकाना आपलेसे करण्यास कारणीभूत ठरतो. अशा मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांनी विविध क्षेत्रात माणसे जिंकली. तालुक्यातील अथवा कुरुंदवाड शहरातील परस्पर विरोधी भूमिका असलेले राजकीय नेते व कार्यकर्ते सुद्धा आपल्या मनातील भावना त्यांच्याकडे मोठ्या विश्वासाने व्यक्त करतात कारण आपण बोललेली गोष्ट सुरक्षित राहील अशी सर्वांची भावना असते हे खरोखर त्यांच्या निःपक्ष असण्याची पावती आहे. तालुक्यातील विधानसभा निवडणुकांचे बदलते रंग असोत, दत्त सारख्या साखर कारखान्यांचे राजकारण असो, वा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तांतरे; कोणत्या नेत्याने कधी, कोणती भूमिका घेतली आणि त्याचा तालुक्यावर काय परिणाम झाला, याचा अचूक ताळेबंद आनंदरावांच्या स्मरणात पक्का असतो.
तुटपुंज्या स्त्रोतावर व खडतर दळणवळणाच्या साधनावर अवलंबून असलेली २० - २५ वर्ष पूर्वीची पत्रकारिता ते आजच्या माहितीच्या युगातील वेगवान पत्रकारिता त्यांनी अनुभवली आहे. सध्याच्या बदलत्या काळानुसार पत्रकारिता त्याना मानवणारी जरी नसली तरी त्यांनी ती स्वीकारली आहे. नवोदित पत्रकाराला ते नेहमीच मार्गदर्शन करत असतात. आयुष्याच्या या टप्प्यावर ते एका अनोख्या ऊर्जेने कार्यरत आहेत, ते एका तरुणाला लाजवेल अश्या उत्साहाने कार्यरत आहेत. त्यांचे कार्य हे नवख्या पत्रकाराला अनुकरणीय असेच आहे.
माझ्यासाठी आनंदराव हे केवळ एक ज्येष्ठ पत्रकार नाहीत, तर ते माझे 'परममित्र' आहेत. पत्रकारितेच्या धावपळीतही त्यांनी मैत्रीचा सुसंवाद कधी तुटू दिला नाही. संकटाच्या वेळी एक ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून योग्य दिशा दाखवणारा आणि आनंदाच्या क्षणात मनापासून पाठीवर हात ठेवणारा असा हा सुहृद मिळणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे.
आनंदराव, तुमची ही लेखणी अशीच तळपत राहो आणि तुमचे मार्गदर्शन आम्हा सर्वांना पुढील अनेक वर्षे लाभत राहो. १ जून रोजी होणारे तुमचे हे 67 व्या वर्षातील पदार्पण तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!"
- धैर्यशील विजय सुतार
अधिवक्ता, उच्च न्यायालय मुंबई
