शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शिरोळ तालुक्यातील एकूण ३५ ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सन २०२४ मध्ये मुदत संपलेल्या २ ग्रामपंचायती तसेच सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ३३ ग्रामपंचायतींसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याबाबतचे वेळापत्रक तहसील प्रशासनाने प्रसिद्ध केले असून संबंधित ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
तहसीलदार शिरोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून २०२६ रोजी यड्राव, शिरढोण, उदगाव, दानोळी, अर्जुनवाड, घालवाड, हसूर, चिपरी, नांदणी, धरणगुत्ती, बुबनाळ, नृसिंहवाडी, शेडशाळ, निमशिरगाव, मजरेवाडी, टाकळीवाडी, जैनापूर आणि कोथळी या ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
तसेच ११ जून २०२६ रोजी कोंडीग्रे, घोसरवाड, कवठेगुलंद, आलास, गणेशवाडी, जुने दानवाड, शिरदवाड, बस्तवाड, तमदलगे, तेरवाड, कुटवाड, दत्तवाड, शिरटी, आगर, गौरवाड, टाकळी आणि जांभळी या ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडणार आहे.
सर्व ग्रामपंचायतींच्या कार्यालयांमध्ये सकाळी ११ वाजता सोडत काढली जाणार असून इच्छुक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि संभाव्य उमेदवारांचे लक्ष या प्रक्रियेकडे लागले आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून यानंतर गावागावातील राजकीय समीकरणांना वेग येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, संबंधित ग्रामपंचायतींच्या नागरिकांनी व इच्छुकांनी निश्चित तारखेला उपस्थित राहावे, असे आवाहन तहसील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
