जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
अन्न व औषध प्रशासन विभागाने जयसिंगपूर येथे बनावट व बेकायदेशीर तूप निर्मिती करणाऱ्या केंद्रावर धडक कारवाई करत सुमारे १ लाख ७८ हजार रुपयांचा तूपाचा साठा जप्त केला. कोल्हापूर जिल्ह्यात नवीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात झालेली ही पहिली मोठी कारवाई मानली जात आहे.
जयसिंगपूर येथे विनापरवाना तूप उत्पादन सुरू असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि. २९ मे २०२६) अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने राहुल भाऊसो मगदूम यांच्या राहत्या घरी अचानक छापा टाकला. तपासणीदरम्यान संबंधित ठिकाणी बनावट व बेकायदेशीरपणे तूपाचे उत्पादन, साठवणूक आणि विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले.
या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी पी. के. घुगे यांनी तातडीने हस्तक्षेप करून म्हैस तूप आणि गाय तूपाचे एकूण चार अन्न नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. तसेच संबंधित ठिकाणी आढळून आलेला ५९५ लिटर तूपाचा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या या साठ्याची बाजारमूल्याप्रमाणे किंमत सुमारे १ लाख ७८ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
ताब्यात घेतलेले नमुने पुढील रासायनिक व गुणवत्ताविषयक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी पी. के. घुगे व श्रीमती प्र. साळुंखे यांच्या पथकाने सहाय्यक आयुक्त (अन्न) श्रीमती प्र. प्र. फावडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडली.
