कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी दगडु चंद्राप्पा कुंभार (वय ५२) यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे आंतरजिल्हा बदलीने कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत असलेल्या शाळेत रुजू झाले होते. त्यांचा थकीत पगार व पगारातील फरक मंजूर करून देण्यासाठी प्रशासन अधिकारी दगडु कुंभार यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला ४० हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनंतर एसीबीने पडताळणी केली असता, आरोपी प्रशासन अधिकाऱ्याने यापूर्वी आंतरजिल्हा बदलीसंदर्भातील नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी १० हजार रुपये स्वीकारल्याची कबुली दिली. तसेच तक्रारदारांचा थकीत पगार व पगारफरक काढून देण्यासाठी तडजोडीअंती २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर एसीबीने सापळा रचला. पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तक्रारदाराकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना दगडु चंद्राप्पा कुंभार यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली.
आरोपी दगडु चंद्राप्पा कुंभार हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असून ते वाशी नाका येथील खामकर गुरुजी कॉलनी परिसरात वास्तव्यास आहेत.
ही कारवाई शिरीष सरदेशपांडे (पोलीस उपमहानिरीक्षक/पोलीस अधीक्षक, एसीबी पुणे), अर्जुन भोसले (अपर पोलीस अधीक्षक, एसीबी पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैष्णवी पाटील (पोलीस उपअधीक्षक, एसीबी कोल्हापूर) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस हवालदार विकास माने, सुधीर पाटील, संगिता गावडे, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील, रविंद्र पाटील आणि प्रशांत दावणे यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही शासकीय कार्यालयात लाचेची मागणी झाल्यास किंवा अपसंपदेबाबत माहिती असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
