Top News

शिरोळकरांनो सावधान..! नदीकाठावर मगरींचा वावर वाढला; विणीचा हंगाम सुरू

इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क : 

    शिरोळ तालुक्यातील कृष्णा, पंचगंगा, दूधगंगा आणि वारणा नदी परिसरात सध्या मगरींच्या विणीचा हंगाम ( मगरींचा पिल्ले जन्माला घालण्याचा आणि त्यांचे संरक्षण करण्याचा काळ म्हणजे विणीचा हंगाम) सुरू झाला असून नदीकाठच्या भागात मगरींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास येत आहे. अनेक ठिकाणी मगरींची अंडी तसेच नव्याने बाहेर पडलेली पिले नदीकाठच्या घरट्यांजवळ दिसून येत असल्याने नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

    कोल्हापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, विणीच्या काळात मगरी अधिक आक्रमक होत असतात. त्यामुळे नदीकाठी जनावरे चारण्यासाठी जाणारे शेतकरी, मासेमारी करणारे नागरिक तसेच नदी परिसरात जाणाऱ्या ग्रामस्थांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मगरींकडून जनावरांवर अथवा मनुष्यांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    वनविभागाने नागरिकांना नदीकाठच्या भागात अनावश्यक वावर टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. नदीकाठी मगर दिसल्यास तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये. तसेच मगरीची पिले पकडणे, अंडी घरी नेणे किंवा त्यांना त्रास देणे असे प्रकार टाळावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

    गेल्या काही दिवसांपासून शिरोळ तालुक्यातील विविध नदीकाठांवर मगरी दिसून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वीही मगर हल्ल्यांत काही नागरिक जखमी झाले असून काहींना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

कोणत्याही नागरिकाला मगरींबाबत संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वनविभाग अथवा टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

थोडे नवीन जरा जुने