Top News

आजीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या तीन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू


चंदगड / शिवार न्यूज नेटवर्क : 

आजीच्या विधीकार्यांसाठी आलेल्या तीन शाळकरी मुलींचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना चंदगड तालुक्यातील हुंदळेवाडी येथे सोमवारी दुपारी घडली.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.धनुष्का पुंडलिक सांबरेकर (वय १५), रिया चंद्रकांत सांबरेकर (वय १२, दोघी मूळ रा. आंबेवाडी, ता. बेळगाव, सध्या रा. पर्वरी, गोवा) आणि स्वरा जयवंत नाईक (वय १३, मूळ रा. होसूर, ता. चंदगड, सध्या रा. उचगाव, ता. करवीर) अशी मृत मुलींची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, रिया व धनुष्काच्या वडिलांची आई तसेच स्वराच्या आईची आई सुशीला सांबरेकर (वय ७०) यांचे आठ दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या विधीकार्यांसाठी संबंधित कुटुंबीय हुंदळेवाडी येथे आले होते. सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास तिन्ही मुली घराजवळील शेततळ्याकडे गेल्या असता त्यांचा पाय घसरून पाण्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.बराच वेळ मुली दिसून न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता त्या शेततळ्यात आढळून आल्या.स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

एका कुटुंबातील आणि नात्याने बहिणी असलेल्या तिन्ही मुलींच्या अकाली मृत्यूमुळे हुंदळेवाडी, उचगाव तसेच गोवा परिसरात शोककळा पसरली आहे.

थोडे नवीन जरा जुने