Top News

“5 टक्के निधीत शिरोळ नगरपरिषदेची फसवणूक”; दिव्यांग बांधवांचा आरोप

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

 विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंकुश दिव्यांग संस्थेच्या वतीने सोमवारी शिरोळ तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी दिव्यांग बांधवांनी शिरोळ नगरपरिषदेवर 5 टक्के दिव्यांग निधीत फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करत जोरदार आंदोलन केले.

तहसीलदार अनिकुमार हेळकर यांच्या दालनात दिव्यांग बांधवांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी कुरुंदवाड येथील दिव्यांगांना वाढीव 4 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. तसेच शिरोळ तालुक्यातील सहा गावांचा 5 टक्के दिव्यांग निधी संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. पेन्शनसह अनेक प्रलंबित प्रश्नांवर तहसीलदारांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिल्याने आंदोलनाला मोठे यश मिळाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, शिरोळ नगरपरिषदेच्या कारभारावर दिव्यांग बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 2022-23 च्या अंदाजपत्रकीय तरतुदीनुसारच चालू वर्षाचा निधी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. यापूर्वी 14 लाख रुपयांचा निधी वाटप झाला होता, मात्र यंदा केवळ 7 लाख रुपये वितरित करण्यात आल्याने “नगरपालिकेचे उत्पन्न कमी झाले आहे का?” असा सवाल उपस्थित करण्यात आला.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या दिव्यांगांनी तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यानंतर तहसीलदार अनिकुमार हेळकर यांनी 26 मे रोजी शिरोळ नगरपरिषद प्रशासन व दिव्यांग बांधव यांच्यात संयुक्त बैठक बोलावली असून अंतिम तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

आंदोलन अंकुश संघटनेचे कृष्णा देशमुख यांनी, “दिव्यांगांच्या कामासाठी अधिकारी 500 रुपये घेत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अपंगांकडून पैसे घेणाऱ्या अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे,” असा संतप्त आरोप केला.

थोडे नवीन जरा जुने