Top News

हातकणंगले परिसरात अंमली पदार्थांचा विळखा; शिवसेना-युवासेनेचा पोलिसांना इशारा

हातकणंगले / शिवार न्यूज नेटवर्क :

 हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा, चरस, एमडी ड्रग्ज तसेच अंमली इंजेक्शनची खुलेआम विक्री आणि सेवन सुरू असल्याचा गंभीर आरोप करत शिवसेना-युवासेना व स्थानिक लोकप्रतिनिधींनी पोलीस प्रशासनाला निवेदन देत तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे. परिसरातील तरुण पिढी आणि शाळकरी मुले नशेच्या विळख्यात अडकत असल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

शिवसेना-युवासेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हातकणंगले तालुक्यातील काही भागांमध्ये अंमली पदार्थांची विक्री दिवसेंदिवस वाढत असून संबंधित टोळ्यांचे मनोबल वाढले आहे. खुलेआम सुरू असलेल्या या अवैध धंद्यामुळे तरुणाई व्यसनाधीन होत असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव, आळतेचे सरपंच अजिंक्यदादा इंगवले, रुकडी जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे, युवासेना जिल्हाप्रमुख निशिकांत पाटील, रुकडीच्या माजी उपसरपंच शीतल खोत, हातकणंगले पंचायत समिती उपसभापती संतोष कांबळे, पंचायत समिती सदस्य सचिन जाधव, संदेश मिसाळ यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंमली पदार्थांच्या वाढत्या वापरामुळे परिसरात गुन्हेगारी, चोरी, मारामाऱ्या तसेच टोळीयुद्धाचे प्रकार वाढत असल्याची चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली. पोलिसांनी वेळीच कठोर कारवाई न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.

“अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचा तात्काळ पर्दाफाश करून त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करावेत, तसेच अशा अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्यांचीही चौकशी करावी,” अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

दरम्यान, परिसरातील पालकांमध्येही या प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शाळकरी मुलांचे भविष्य वाचवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

— प्रतिनिधी : संदीप कोले, शिवार न्यूज.

थोडे नवीन जरा जुने