Top News

बोरगाव टेक्सटाईल पार्क प्रकरण : कमिशनर के. ज्योती असताना टी.एच. कुमार पाहणीस कसे? विरोधकांचा जंगटे यांच्यावर दिशाभूल केल्याचा आरोप

अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

बोरगाव टेक्सटाईल पार्कमध्ये झालेल्या गैरकारभाराबाबत पत्रकार परिषद घेऊन युवा नेते शिशिर सातपुते, भाऊसाहेब पाटील, शिवाप्पा माळगे, अण्णासाहेब बारवाडे, नगरसेवक रोहित पाटील, भरत हवले, बाळासाहेब बसन्नावर आणि विद्याधर अम्मन्नावर यांनी अध्यक्ष शरद जंगटे यांच्यावर जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला. सध्या बंगळुरू येथे वस्त्रोद्योग कमिशनर म्हणून के. ज्योती कार्यरत असताना टी.एच. कुमार यांनी टेक्सटाईल पार्कची पाहणी करून समाधान व्यक्त केल्याचा दावा चुकीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बोरगाव टेक्सटाईल पार्कमध्ये बोगस लाभार्थी आणि अनियमिततेमुळे कर्नाटक शासनाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसल्याची तक्रार बोरगाव ग्रामस्थांनी सरकारकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत बेळगाव येथील निगमचे अधिकारी जयचंद पाटील यांनी टेक्सटाईल पार्कची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल सरकारकडे पाठविला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना शिशिर सातपुते म्हणाले की, टेक्सटाईल पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात गैरकारभार झाला असून महाराष्ट्रातील काही लाभार्थ्यांनी खोटी कागदपत्रे सादर करून सबसिडीचा गैरफायदा घेतला आहे. हे प्रकरण आम्ही उचलून धरल्यामुळे संबंधितांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची यादी समोर असतानाही बोगस नावे दाखवण्याची मागणी केली जात आहे. टेक्सटाईल पार्कमध्ये वस्त्रोद्योगाशी संबंधित नसलेले अनेक व्यवसाय सुरू असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. मंजूर सबसिडीपैकी किती उद्योग प्रत्यक्षात सुरू आहेत याचा खुलासा होणे आवश्यक आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बेळगाव येथील टेक्सटाईल विभागाचे अधिकारी जयचंद पाटील यांनी टेक्सटाईल पार्कची पाहणी केली. मात्र त्यांनी कोणाचेही कौतुक केले नसताना अध्यक्ष शरद जंगटे यांनी मुख्य कमिशनर येऊन कामाचे कौतुक केल्याचा दावा केला, असेही विरोधकांनी म्हटले आहे.

तसेच टेक्सटाईल पार्कचा अध्यक्ष अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील असणे बंधनकारक असतानाही हा नियम पाळला गेला नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून बोगस लाभार्थी तसेच महाराष्ट्रातील संबंधितांवर कारवाई झाल्याशिवाय आमचा लढा थांबणार नाही, असा इशाराही युवा नेते शिशिर सातपुते यांनी दिला.



थोडे नवीन जरा जुने