अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बेलगाव जिल्हा डीसीसी बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या सहकार्याने तसेच निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून बोरगाव शहराच्या विकासासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती श्री हालशुगरचे संचालक व बोरगावचे नगरसेवक शरद जंगटे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना शरद जंगटे म्हणाले की, संत रोहिदास मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आमदार शशिकला जोल्ले यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते. या मागणीची तातडीने दखल घेत शहरातील संत रोहिदास मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून मंदिराचे बांधकाम तसेच मंदिर परिसरात आवश्यक व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
तसेच शहरातील वार्ड क्रमांक ५, ६, ८, ९, १०, १५, १६ आणि १७ या एकूण आठ वार्डांमध्ये रस्ते व गटारींच्या कामांसाठी जवळपास दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मंजूर निधीतून संबंधित विकासकामांना लवकरच सुरुवात होणार असल्याची माहितीही जंगटे यांनी दिली.
निपाणी मतदारसंघातील बोरगाव हे लोकसंख्येच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर असून निपाणीबरोबरच बोरगावचा सर्वांगीण विकास करणे हे जोल्ले दांपत्यांचे ध्येय असल्याचेही त्यांनी नमूद केले. शहराच्या विकासासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बी. के. महाजन, अजित तेरदाळे, जितू पाटील, सचिन कोळी, शंकर गुरव, महावीर चोकावे, बंडू माळी, रावसाहेब चोकावे, बबन रेंदाळे, भरत पाटील, संजू महाजन, बाळू चौगुले, बाहुबली पाटील, महादेव ऐदमाळे, भरत कांबळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
