तारदाळ / शिवार न्यूज नेटवर्क :
तारदाळ येथे सोमवारी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.नागनाथ मंदिरासमोर भरवर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत तरुणाचे नाव जावीद रसीद मुजावर (वय २५) असे असून यश तानाजी गायकवाड (वय १९) हा या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. जावीद व यश यांच्यात गेल्या महिनाभरापासून वाद सुरू असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,सोमवारी सायंकाळी नागनाथ मंदिरासमोरील एका पानपट्टीजवळ जावीद मुजावर व यश गायकवाड यांची समोरासमोर गाठ पडली. जुन्या वादाच्या कारणावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला आणि त्याचे रूपांतर झटापटीत झाले.यावेळी दोघांनीही एकमेकांवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे सांगितले जात आहे.या झटापटीदरम्यान जावीद याच्यावर छाती,मान,पोट व हातावर गंभीर वार झाले.गंभीर जखमी अवस्थेत तो घटनास्थळावरच कोसळला.जीव वाचवण्यासाठी तो जवळील गणेश मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत असलेल्या एका गाडीच्या मागे गेला,मात्र यश गायकवाड याने त्याचा पाठलाग करत पुन्हा त्याच्यावर वार केल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान,जावीद रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून ग्रामस्थांनी त्याला तातडीने हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मात्र डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.या घटनेत जखमी झालेल्या यश गायकवाड यालाही पुढील उपचारासाठी इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान,दोन दिवसांपूर्वी तारदाळ चौकात दोघांमध्ये एकमेकांना पाहून घेण्याची धमकी दिल्याची चर्चा स्थानिकांमध्ये होती.वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे तारदाळ चौक व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मोठा बंदोबस्त तैनात केला असून पुढील तपास सुरू आहे.
