कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
मुरगूड येथील आठवडी बाजारासाठी आणण्यात आलेली एक म्हैस अचानक बिथरल्याने बाजारपेठेत काही काळ मोठी धांदल उडाली. बिथरलेली म्हैस बाजारपेठेतील नामदेव भाट यांच्या बोळातून धावत जाऊन थेट पायऱ्या चढत सुहास चौगुले यांच्या घराच्या टेरेसवर पोहोचली.या प्रकारामुळे बाजारात उपस्थित नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.आठवडी बाजार असल्यामुळे बाजारपेठेत मोठी गर्दी होती.अचानक म्हैस बिथरून वेगाने धावू लागल्याने काही काळ नागरिकांची पळापळ झाली.धावताना म्हैस नामदेव भाट यांच्या बोळातून आत शिरली आणि तेथून सुहास चौगुले यांच्या घराच्या पायऱ्या चढत थेट टेरेसवर गेली.या धावपळीत टेरेसवर बसवलेले सोलर पॅनल तसेच फुलांच्या कुंड्यांचे नुकसान झाले.दरम्यान, ही म्हैस तेजस मोरे यांच्या मालकीची असल्याचे समजते. टेरेसवर म्हैस गेल्याची माहिती मिळताच परिसरातील तरुणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.संतोष सोनुले या धाडसी तरुणाने पुढाकार घेत म्हशीला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याला सतीश साळोखे, तेजस सोनुले, सोमनाथ यरनाळकर, आकाश भाट आणि राहुल पाटील या तरुणांनीही मदत केली.या सर्व तरुणांनी मोठ्या धैर्याने आणि संयमाने परिस्थिती हाताळत बिथरलेल्या म्हशीला शांत केले. त्यानंतर म्हशीला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात यश आले. या घटनेमुळे संभाव्य मोठा अपघात टळला.घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मदत करणाऱ्या तरुणांच्या धाडसाचे आणि तत्परतेचे कौतुक केले. वेळेवर केलेल्या त्यांच्या प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना टळली आणि परिसरातील वातावरण पुन्हा शांत झाले.
