कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
देवदर्शनासाठी आलेल्या युवकाचा कृष्णा नदीत पोहताना बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथे घडली. आकाश बबन जकाते (वय. 29, रा. कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश जकाते हा आपल्या दोन मित्रांसोबत एसटीने नृसिंहवाडी व खिद्रापूर येथे देवदर्शनासाठी आला होता. तिघांनी प्रथम नृसिंहवाडी येथे कृष्णा नदीत स्नान करून देवदर्शन घेतले. त्यानंतर ते खिद्रापूर येथे दर्शनासाठी आले होते.
खिद्रापूर येथेही तिघे नदीत अंघोळ करण्यासाठी उतरले. काही वेळानंतर त्याचे दोन्ही मित्र नदीबाहेर आले; मात्र आकाश जकाते हा बाहेर आला नाही. त्यामुळे मित्रांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असताना एका मित्राच्या हाताला त्याचा पाय लागल्याने त्याला पाण्याबाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर त्याला तातडीने सैनिक टाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह कुरुंदवाड येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.या घटनेची वर्दी खिद्रापूर येथील पोलीस पाटील दिपाली बाळासाहेब पाटील यांनी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात दिली असून पुढील तपास सुरू आहे.
