चंदगड / शिवार न्यूज नेटवर्क :
चंदगडच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून हत्तींचा वावर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.उमगाव,सामंतवाडी आणि परिसरातील गावांमध्ये हत्तींच्या कळपामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वारंवार होणाऱ्या या उपद्रवामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.गेल्या काही रात्रींमध्ये हत्तींचा कळप गावाच्या शिवारात घुसल्याच्या घटना घडल्या.हत्तींच्या डरकाळ्या,वाहनांवर झालेल्या धडकांचा कर्कश आवाज आणि जमिनीवर आदळणाऱ्या धातूच्या वस्तूंचा गडगडाट यामुळे मध्यरात्री संपूर्ण वाडी जागी झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.काही ठिकाणी शेतातील उभी पिके तुडवली गेली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
चंदगड तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून हत्तींसह इतर वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे शेतीपिके,घरे तसेच काही ठिकाणी वाहनांचेही नुकसान झाल्याच्या घटना समोर येत आहेत.या सततच्या त्रासामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.या पार्श्वभूमीवर हत्तींचा उपद्रव कायमस्वरूपी रोखण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. प्रभावित भागात संरक्षक कुंपण उभारणे, वनविभागाकडून नियमित गस्त वाढवणे तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दरम्यान,वनविभागाने रात्रीच्या वेळी गस्त घालून हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवावे व ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.शासन व वनविभाग या गंभीर समस्येकडे कितपत लक्ष देतात आणि कोणत्या ठोस उपाययोजना राबवतात,याकडे चंदगड तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
