यड्राव / शिवार न्यूज नेटवर्क :
यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये उत्कृष्ट काम करणा-या प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले. थरमॅक्स बॅकॉक आणि विलॉक्स इनर्जी सोल्युशनचे मॅन्युपॅक्चरिंग हेड अबिद इनामदार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे अध्यक्षस्थानी होते.
महाविद्यालयातील डॉ. एस.व्ही. कुंभार (ऑटोमेशन अॅण्ड रोबोटीक्स), प्रा. स्वाती हालुंडे (इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर इंजिनिइअरिंग), प्रा. अपुर्वा बापट (बेसिक सायन्स अॅण्ड ह्युमॅनिटीस), यांचा उत्कृष्ट शिक्षक तर प्रल्हाद सावंत, अमित चौगुले, नितीन आळतेकर यांचा उत्कृष्ट सेवक म्हणून सन्मान करण्यात आला.
यावेळी श्री. बागणे म्हणाले, “कोणतीही संस्था यशाच्या शिखरावर पोहोचते ती केवळ भौतिक सुविधांमुळे नाही, तर तेथील समर्पित, कर्तव्यदक्ष आणि दूरदृष्टी असलेल्या स्टाफमुळे. शिक्षक हे ज्ञानाचे दीपस्तंभ आहेत, तर शिक्षकेत्तर कर्मचारी ही संस्थेची भक्कम पायाभरणी आहेत. त्यांच्या निष्ठा, परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच शरद संकुलाने अल्पावधीत उल्लेखनीय प्रगती साधली आहे.”
“प्रदान करण्यात आलेले हे पुरस्कार केवळ व्यक्तींचा सन्मान नाहीत, तर संपूर्ण टीमच्या कार्यसंस्कृतीचा गौरव आहे. या सन्मानाचे खरे हक्कदार आपल्या संस्थेतील प्रत्येक प्राध्यापक आणि कर्मचारी आहेत. आपण सर्वांनी यापुढेही गुणवत्ता, शिस्त आणि नवोपक्रम यांचा ध्यास घेत संस्थेला अधिक उंचीवर नेण्याचा संकल्प करूया.”
यावेळी सर्व आदर्श शिक्षकांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. बाहुबली संगमे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ. एस.के. शिकलगार, डॉ. एस.आर. घोरपडे, सर्व डिन, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते. सूत्रसंचालन डॉ. एस.आर. घोरपडे यांनी केले. आभार प्रा. धनश्री बिरादार यांनी मानले.
