Top News

चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याकडून ऊस तोडणी व वाहतूक कामगारांचा सत्कार


अमर माने / शिवार न्यूज नेटवर्क :

चिक्कोडी येथील चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखाना येथे बुधवार दिनांक ११ मार्च २०२६ रोजी हंगाम २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ऊस तोडणी व वाहतूक कामगारांसह ऊस शेतातील कर्मचाऱ्यांचा स्वागत व सत्कार कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कारखान्याचे संस्थापक मा. प्रभाकरआण्णा कोरे, केएलई संस्थेचे नवे कार्यकारी अध्यक्ष श्री.अमितआण्णा कोरे तसेच कारखान्याचे अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने चालू हंगामात तब्बल १० लाख ६० हजार मेट्रिक टन ऊसाचे यशस्वी गाळप करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी व्यवस्थापन मंडळाचे सदस्य श्री. भरतेश बनवणे यांनी प्रास्ताविक करताना कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकरी सदस्यांचे तसेच कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगारांचे मनापासून अभिनंदन केले. ऊस तोडणी व वाहतूक कामगारांनी घेतलेल्या कष्टामुळेच कारखान्याचा गाळप हंगाम यशस्वीपणे पूर्ण झाल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक श्री. आर. बी. खंडगावे यांनी आपल्या भाषणात ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी व वाहतूक कामगार तसेच कारखान्यातील सर्व कर्मचारी व कामगारांचे हंगामात घेतलेल्या परिश्रमाबद्दल आभार व्यक्त केले. सर्वांच्या सहकार्यामुळेच कारखाना सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे स्वागत भाषण कारखान्याचे वरिष्ठ महाव्यवस्थापक (ऊस) श्री. एन. एस. हिरेमठ यांनी केले, तर आभार प्रदर्शन ऊस विकास अधिकारी श्री. सचिन मोपगार यांनी केले.

या प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष श्री. तात्यासाहेब काटे, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अजितराव देसाई, चेतन पाटील, अण्णासाहेब इंगळे, रामू म्हैशाळे, भीमगौडा पाटील तसेच कारखान्याच्या विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, कामगार, ऊस तोडणी व वाहतूक व्यवस्थापक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ऊस तोडणी व वाहतूक कामगारांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या सत्कारामुळे कामगारांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


थोडे नवीन जरा जुने