संदीप कोले / शिवार न्यूज नेटवर्क :
हातकणंगले तालुक्यातील हेरले गावातील युवक शिरीष चौगुले यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड मिळवली आहे. या यशाबद्दल हेरले ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
पौलस मधुकर चौगुले यांचे चिरंजीव असलेल्या शिरीष चौगुले यांनी अथक परिश्रम, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली. ग्रामीण भागातून कठोर परिश्रम करून मिळवलेल्या या यशामुळे त्यांनी आपल्या कुटुंबासह गावाचे नाव उज्वल केले आहे. त्यांच्या यशामुळे परिसरातील तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा मिळत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या सत्कार समारंभावेळी हेरले गावचे लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे, उपसरपंच निलोफर खतीब, उर्मिला कुरणे, अमित पाटील, माजी सरपंच रियाज जमादार, मनोज पाटील, राकेश जाधव, तसेच नवसंकेत न्यूजचे संपादक संभाजी चौगुले, सविता पाटील, शुभांगी चौगुले, सुमन चौगुले व इतर ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी शिरीष चौगुले यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
