हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
वेगवेगळ्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या गुणांना विशिष्ट उंचीवर घेऊन जाण्याचे नवनिर्मिती केंद्र म्हणून हेरवाड हायस्कूल, हेरवाड कडे पाहत येईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या श्रद्धाताई गायकवाड यांनी केले.
महिला दिनाच्या औचित्याने माता पालकांच्यासाठी हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित केलेल्या विविध अंगी कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी हेरवाड गावच्या सरपंच रेखा जाधव या होत्या. जिल्हा परिषद सदस्या उत्तरादेवी शिंदे सरकार , ग्रामपंचायत सदस्य दयानंद पाटील, सुनिता माने, विजयाला पाटील, सुनिता कांबळे, शालेय समिती सदस्य रावसाहेब पाटील, हलगीपटू योगेश गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती.
सौ. गायकवाड बोलताना पुढे म्हणाल्या शालेय माध्यमातूनच पुढे महान विभूतींचा जन्म होत असतो. आज महिला दिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये आले तेव्हा मुलींची वेगवेगळी वेशभूषा, शाळेच्या प्रांगणात टेबलावर ठेवलेली पुस्तक पाहून शाळा पुस्तकांची वाटणं, वेगवेगळ्या महिला स्पर्धातून माता पालकांची शाळेशी नाळ जोडणे, मुलींच्या मर्दानी प्रात्यक्षिकातून संरक्षणाचे धडे देणे, लेझीमच्या माध्यमातून भारतीय संविधान प्रेरित करणे यासह अनेक उपक्रम या शाळेत पाहिल्यानंतर ही नवनिर्मिती करणारी शाळा आहे असेच माझ्या तरी मनात घर करून राहिले आहे. विद्यार्थ्यांनी पालकांनी शाळेच्या या दृष्टिकोनाचा फायदा करून घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी दत्तवाड जिल्हा परिषद सदस्या उत्तरादेवी शिंदे सरकार व सरपंच रेखा जाधव यांचे अध्यक्षीय भाषणे झाली.
स्वागत मुख्याध्यापक प्रकाश मोहिते यांनी केले, कार्यक्रमाचा हेतू मुनीसा पठाण यांनी सांगितला तर संजीवनी निर्मळे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. गोवा येथील सिग्मोत्सवासाठी लेझीम पथक घेऊन गेलेल्या लेझीम प्रशिक्षक धनंजय धोत्रे यासह क्रीडा शिक्षक अजित दिवटे, गोपाळ प्रधाने, सीमा माळी व लेझीम पथकातील गटनायकांचा सत्कार तसेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एन एन एम एस) परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर शालेय मुलींच्या लाठीकाठी, पेटती लाटी फिरवणे व तलवारबाजी या मर्दानी प्रात्यक्षिकांनी शालेय विद्यार्थी व माता पालक मंत्रमुग्ध झाले. दरम्यान माता पालकांच्या उखाणे,पाककला, संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धांनी कार्यक्रमाला रंगत चढली. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा डांगे यांनी केले तर कल्पना माळी यांनी आभार मानले. या कार्यक्रमास साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील,सचिव अजित पाटील व सर्व संचालक यांचे प्रोत्साहन मिळाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
