तेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
तेरवाड हे आपुलकीचे, एकजुटीचे आणि प्रगतीशील विचारांचे गाव आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना आणण्याचा प्रयत्न केला जाईल. शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करून गावाचा विकास घडवून आणण्यास मी कटिबद्ध आहे, असे मनोगत नूतन जिल्हा परिषद सदस्या श्रद्धाताई गायकवाड यांनी व्यक्त केले.
तेरवाड येथे आर्यन्स मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या तसेच नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या श्रद्धाताई गायकवाड यांचा सत्काराचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रद्धाताई गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय संपादन केलेल्या पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि जनसेवेतील कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना श्रद्धाताई गायकवाड यांनी सांगितले की, गावाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांच्या समस्या समजून घेत त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जातील. जिल्हा परिषद पातळीवर विविध विकास योजना आणून त्या गावापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
तेरवाडसह परिसरातील गावांमध्ये पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी रस्ते, शिक्षण, आरोग्य सुविधा तसेच सामाजिक विकासाच्या योजना राबविण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच विकासकामांना गती मिळते, असे सांगत त्यांनी सर्वांनी एकत्रितपणे गावाच्या प्रगतीसाठी काम करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला कुरुंदवाडचे तहसीलदार दिलीप रायणावर, पोलीस उपनिरीक्षक साळुंखे, विलास कांबळे, शाबगोंडा पाटील, संजय शिंदे तसेच सरपंच गोंधळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
