शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यात सध्या उसाची लागण व खोडवा पिकांना भर देण्यासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे डीएपी, युरिया आदी खतांची मागणी वाढली असताना काही खत कंपन्या व विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. खत देताना जबरदस्तीने इतर उत्पादने किंवा कमी मागणीची खते जोडून देण्याची ‘लिंकिंग’ पद्धत राबवली जात असून ही सक्ती तात्काळ थांबवावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने देण्यात आला.याबाबतचे निवेदन तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की, खतांच्या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत काही कंपन्या व विक्रेते बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण करत आहेत. परिणामी शेतकऱ्यांना आवश्यक असलेले डीएपी आणि युरिया यांसारखी खते मिळवण्यासाठी लिंकिंगची सक्ती सहन करावी लागत आहे. ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत अन्यायकारक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.तालुक्यात गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्यामुळे खत विक्रेत्यांवर कोणतीही प्रभावी देखरेख होत नसल्याचा आरोपही करण्यात आला. अनेक दुकानांमध्ये खताचा उपलब्ध स्टॉक तपासला जात नाही तसेच शेतकऱ्यांना माहिती मिळावी म्हणून स्टॉक बोर्डवर दर्शविण्याचे नियमही पाळले जात नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. संबंधित दोषी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.तसेच जिल्हा कृषी अधीक्षकांनी आपल्या अधिकाराचा वापर करून खत कंपन्यांना स्पष्ट आदेश देत लिंकिंगची सक्ती तात्काळ थांबवावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा येत्या काळात कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा शेतकरी प्रतिनिधींनी दिला.यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाधिकारी दीपक पाटील, कार्याध्यक्ष राकेश जगदाळे, शिरोळचे नगरसेवक अमर शिंदे, मंगेश नलावडे, भूषण गंगावणे, रशीद मुल्ला, सचिन पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.
