हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरढोण येथील रमजानशेठ बाणदार विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मोठे योगदान दिलेल्या दिग्गज महिलांची वेशभूषा परिधान करून त्यांचे कार्य सादर केले. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या भूमिकांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महिला सन्मानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक खरात सर, पर्यवेक्षिका देसाई सर तसेच माणिकराव भोसले सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी महिलांचे समाजातील योगदान, त्यांचे कर्तृत्व आणि सन्मान याबद्दल विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार मांडले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये महिलांबद्दल आदर, सन्मान आणि जागरूकता निर्माण झाली. कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडले.
