शिरोळ / संतोष तारळे -
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याच्या क्रांतिकारी भूमीतून पुढे आलेल्या उर्मिला श्रीधर राजमाने (कवठेकर )यांनी आपल्या जिद्द, प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कामकाजाच्या बळावर सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या त्या शिरोळ येथे सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) म्हणून कार्यरत असून प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. तलाठी पदापासून सुरू झालेला त्यांचा प्रशासकीय प्रवास आज सहकार विभागातील महत्त्वाच्या जबाबदारीपर्यंत पोहोचला आहे. शेतकरी, सभासद आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत त्यांनी अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या असून त्यांच्या कार्याची सहकार क्षेत्रात विशेष दखल घेतली जात आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील आष्टा या शहरात त्यांचे बालपण गेले. प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी आष्टा येथेच पूर्ण केले. आई-वडील दोघेही प्राथमिक शिक्षक असल्याने शिक्षणाचे संस्कार त्यांना घरातूनच मिळाले. आई वडिलांचे प्रोत्साहनामुळे शालेय जीवनातच प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि त्या दिशेने सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. वाणिज्य शाखेत शिक्षणात महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवत त्यांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली.
एम.कॉमचे शिक्षण घेत असताना २००३ मध्ये मिरज उपविभागात तलाठी पदावर त्यांची निवड झाली. तलाठी म्हणून काम करताना प्रशासनाचे कामकाज जवळून पाहण्याची संधी मिळाली. सांगली जिल्ह्यात आलेल्या २००५ आणि २००७ च्या पूर परिस्थितीत काम करताना संकटकाळात प्रशासनाची भूमिका किती महत्त्वाची असते, याचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला. त्याच काळात त्यांनी एमपीएससीच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.
एमपीएससीच्या माध्यमातून २००४ च्या जाहिरातीतून त्यांची सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था या पदावर मार्च २००९ मध्ये नियुक्ती झाली. मिरज येथे सहाय्यक निबंधक (दुग्ध) म्हणून काम करताना त्यांनी दूध भेसळविरोधी तपासणी मोहीम राबवून प्रभावी कामगिरी केली. त्यानंतर सांगली येथे जिल्हा उपनिबंधक कार्यालयात काम करताना विकास संस्था सचिवांच्या सेवा नियमांमध्ये सुसूत्रता आणण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले.
कवठेमहांकाळ तालुक्यात काम करताना शेतकरी कर्जमाफी योजनेचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. तसेच खाजगी सावकारीविरोधात धडक कारवाई करत अनेक ठिकाणी छापे टाकले. या कारवाईमुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला. एका पीडित महिलेने फोन करून सावकारांच्या त्रासातून मुक्त झाल्याचे सांगत आभार व्यक्त केले. त्या घटनेमुळे आपल्या कामाचा समाजावर सकारात्मक परिणाम होत असल्याची जाणीव त्यांना झाली.
पर्यावरण संवर्धनासाठीही त्यांनी पुढाकार घेतला. कवठेमहांकाळ या दुष्काळी भागात बाजार समिती परिसर, दंडोबा डोंगर, शाळा आणि महाविद्यालय परिसर तसेच रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात त्यांनी सहभाग घेतला. आज ती झाडे मोठी झालेली पाहून समाधान वाटते, असे त्या सांगतात.
तासगाव बाजार समितीवर सुमारे दीड वर्ष प्रशासक म्हणून काम करताना त्यांनी समितीचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले. संवेदनशील मानली जाणारी बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली. जिल्हा केडर सीईओ म्हणून काम करताना सचिवांच्या सेवा नियम व वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे कामही त्यांनी केले. पतसंस्था फेडरेशन येथे कलम 101 नुसार वसूली दाखलेचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल सांगली जिल्हा पतसंस्था फेडरेशनकडून त्यांचा कार्यगौरव सन्मान करण्यात आला.
सध्या शिरोळ तालुक्यात सहाय्यक निबंधक म्हणून काम करताना त्या तालुक्यातील विकास संस्थांचे संगणकीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तालुक्यातील 141 पैकी १३३ संस्थांचे संगणकीकरण पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार आहे. तसेच उमळवाड़ येथील खाजगी सावकारावर झालेली कारवाईने शिरोळ तालुक्यातील खाजगी सावकारांवर जरब बसविला. तसेच पतसंस्थांच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन सहकार क्षेत्रातील नवीन नियम व सुधारणा यांची माहिती देऊन त्यांच्या कामकाजात सूसूत्रता आणण्यावर त्या विशेष भर देत आहेत.
सहकार ही केवळ व्यवस्था नसून विश्वास, पारदर्शकता आणि सामूहिक प्रगतीची शक्ती आहे, असे मत व्यक्त करत त्या सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रवासात पती श्रीधर राजमाने (तहसीलदार, चिमूर) यांचेही मोठे प्रोत्साहन लाभले आहे. प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून उर्मिला राजमाने यांचे कार्य आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
