शिरोळ येथे जायंटस ग्रुप ऑफ सहेली व नूतन जायंटस ग्रुप ऑफ दत्तगुरु शिरोळचा शपथविधी व पदग्रहण सोहळा संपन्न
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
जायंटस वेल्फेअर फाउंडेशन फेडरेशनने महाराष्ट्रासह देशभरात कार्याचा विस्तार केला असून ग्रामीण व शहरी भागात विविध सामाजिक उपक्रम राबवत जनतेशी जिव्हाळ्याचे नाते जपले आहे. पर्यावरण संवर्धन, सामाजिक सलोखा आणि आरोग्यविषयक उपक्रमांद्वारे मोठे कार्य घडवता येते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी प्लास्टिकमुक्त गाव, पर्यावरण संरक्षण व आरोग्य यांसारख्या समाजाभिमुख संकल्पना प्रभावीपणे राबवाव्यात, असे प्रतिपादन विशेष समिती सदस्य डॉ. राजकुमार पोळ यांनी केले.
येथील टारे हाऊस क्लब येथे जायंटस वेल्फेअर फाउंडेशन फेडरेशन फेड 2 क युनिट 12 च्या वतीने आयोजित कार्यक्रमात जायंटस ग्रुप ऑफ शिरोळ सहेली तसेच नव्याने स्थापन झालेल्या जायंटस ग्रुप ऑफ दत्तगुरु शिरोळ या ग्रुपचा शपथविधी व पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर सामुदायिक प्रार्थना झाली. स्वागत हेमलता जाधव यांनी केले.
जायंटस ग्रुपच्या भाग्यश्री जोशी यांनी जायंटस ग्रुप ऑफ सहेलीच्या नूतन अध्यक्षा स्मिता सम्यक तसेच जायंटस ग्रुप ऑफ दत्तगुरु शिरोळचे नूतन अध्यक्ष दाऊद मोमीन व त्यांच्या कार्यकारिणीला शपथ दिली.
यावेळी नूतन अध्यक्ष दाऊद मोमीन, स्मिता सम्यक, खजिनदार डॉ. दगडू माने, फेड 2 क अध्यक्षा अनुजा पाटील, उपाध्यक्षा डॉ. स्नेहल कुलकर्णी तसेच स्पेशल ऑफिसर सुधीर कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास युनिट डायरेक्टर ॲड. भाग्यश्री जोशी, फेड ऑफिसर हेमलता जाधव, उपाध्यक्षा विजया रावण यांच्यासह कार्यकारिणी सदस्य व मोठ्या संख्येने पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भाग्यश्री जोशी यांनी मानले.
