Top News

शिरढोण येथे क्रिकेटच्या वादातून एकावर कोयत्याने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा

 



कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरढोण (ता. शिरोळ) येथे घरासमोर क्रिकेट खेळण्याच्या वादातून एका शेतकऱ्यावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी दोन जणांसह एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश राऊ भंडारे (वय ४०, व्यवसाय शेती, रा. विठ्ठल मंदिराजवळ, शिरढोण ता. शिरोळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिद्धार्थ मोहन कांबळे (वय २५) आणि किसन अनिल कांबळे (वय २९, दोघे रा. शिरढोण) तसेच एका अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरासमोर काही मुले क्रिकेट खेळत होती. खेळताना वारंवार चेंडू घराच्या दारात येत असल्याने प्रकाश भंडारे यांनी संबंधित मुलांना बॉल जाऊ नये म्हणून जाळी लावण्याबाबत समजावून सांगितले. मात्र याचा राग आल्याने संशयित संशयित आरोपी सिद्धार्थ कांबळे व किसन कांबळे यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत “आम्ही येथे क्रिकेट खेळणार, तू कोण आम्हाला सांगणारा” असे म्हणत वाद घातला.

यानंतर संशयित आरोपींनी फिर्यादीच्या अंगावर धाव घेतली. त्यावेळी संशयित आरोपी सिद्धार्थ कांबळे याने जवळील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर वार केल्याने ते जखमी झाले. दरम्यान, घटनास्थळी जमलेल्या जमावातील एका अज्ञात इसमाने फिर्यादीच्या पत्नीला हाताने मारहाण करून शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल चव्हाण करीत आहेत.

थोडे नवीन जरा जुने